Anita Advani and Rajesh Khanna Relationship Controversy: बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि अनिता अडवाणी यांच्यातील नात्याबाबत बॉम्बे हायकोर्टाने १ एप्रिल २०२६ रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कोर्टाने अनिताची याचिका फेटाळत हे नाते केवळ ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ असल्याचे स्पष्ट केले. या निकालानंतर अनिता अडवाणीने संताप व्यक्त केला असून हा ‘न्यायाचा विनोद’ असल्याची टीका केली आहे. विक्की लालवानीशी बोलताना ती म्हणाली, “आम्ही १४ वर्षे पती-पत्नीसारखेच राहत होतो. त्यांनी मला मंगळसूत्रही घातले होते, पण आज मला माझे नाते सिद्ध करण्याची संधीही दिली जात नाहीये.”

१० वर्षांचं नातं असल्याचा दावा

अनिता अडवाणीने दावा केला की ती राजेश खन्नाबरोबर एक दशक (२००२ ते २०१२) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. तिच्या मते, त्यांचं लग्नही झालं होतं. दोघांनी घरीच असलेल्या मंदिरात लग्न केलं होतं. मात्र राजेश खन्ना यांचे कुटुंबीय म्हणजेच डिंपल कपाडिया आणि ट्विंकल खन्ना यांनी अनिताचे हे सर्व दावे फेटाळून लावले.

मी लग्नाचा नाही, पत्नी म्हणून अधिकार मागितला – अनिता अडवाणी

विक्की लालवानीशी बोलताना अनिता अडवाणीने कोर्टाचा निर्णय आणि कायदेशीर लढाईवर भाष्य केलं. “मी पत्नी म्हणून मिळणारे हक्क मागितले होते, लग्नाचा अधिकार नाही; या दोन्ही गोष्टींत फरक आहे,” असं ती म्हणाली. “कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार, या नात्याला पत्नीच्या बरोबरीची मान्यता आहे. त्यासाठी कायदेशीररित्या विवाहित असणं गरजेचं नाही. जर दोन प्रौढ व्यक्ती पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत असतील, तर ते नातं लग्नासारखंच मानलं जातं, फक्त ते सिद्ध करण्याची गरज असते,” असंही अनिताने स्पष्ट केलं.

मी कधीच हार मानणार नाही – अनिता अडवाणी

लग्नाबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ती म्हणाली, “१४ वर्षांनंतरही मला माझं नातं सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही. खटला न चालवता दिवाणी प्रकरणाचा निकाल कसा लागू शकतो? हा न्यायाचा विनोद आहे.” पुढे काय करणार, असं विचारल्यावर ती म्हणाली, “मी सध्या विचार करतेय. पण मी थकलेली नाही आणि मी कधीच हार मानणार नाही. मी पळपुटी किंवा कमकुवत स्त्री नाही.”

तडजोडीचा सल्ला, पण काहीच झालं नाही

अनिता अडवाणी म्हणाली, “या प्रकरणात तडजोड करण्याचा सल्ला देण्यात आला होता, मात्र पुढे काहीच झालं नाही.” जुन्या गोष्टींचा संदर्भ देत ती म्हणाली, “त्यांच्या (राजेश खन्ना यांच्या कुटुंबाच्या) वकिलांनी माझ्या वकिलांना तडजोड करण्याबाबत विचारलं होतं. त्यांना नक्की काय द्यायचं होतं, हे मला माहीत नाही. सुरुवातीला माझी इच्छा नव्हती, पण नंतर मी थोडी तयार झाले, तरीही पुढे काहीच घडलं नाही.”

आम्ही पती-पत्नीसारखेच होतो, यात लपवण्यासारखं काही नाही- अनिता अडवाणी

राजेश खन्ना यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “आम्ही पती-पत्नीप्रमाणेच राहत होतो. यात लपवण्यासारखं काहीच नाही, ही आमची वैयक्तिक बाब होती. मी आणि ते, आम्ही दोघेही या नात्यात खूप आनंदी आणि समाधानी होतो. त्यांनी मला मंगळसूत्रही घातले होते, आमचं लग्न हा एक छोटासा खासगी सोहळा होता.”

अनिता पुढे म्हणाली, “मी एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेय, मला कोणाकडून काहीच नकोय. मी त्यांच्यासोबत होते कारण माझं त्यांच्यावर प्रेम होतं; ते सुपरस्टार होते किंवा त्यांच्याकडे पैसा होता म्हणून नाही. आमचं लग्न होऊ शकत नाही याची मला कल्पना होती, कारण कुटुंबाच्या अपेक्षा खूप जास्त होत्या. माझे आयुष्य आता पूर्वीसारखे राहिले नाही. मला माझा मान-सन्मान परत हवा आहे. माझ्याबरोबर जे गैरवर्तन झाले, ते अत्यंत वाईट होते.”

त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटू दिले नाही – अनिता अडवाणी

आपले दुःख व्यक्त करत अनिता म्हणाली, “त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये राजेश खन्नांना भेटू दिलं नाही. ‘राजेश खन्ना यांना तुला भेटायचं नाहीये’ असे सांगून माझ्याबद्दल अनेक खोटी वक्तव्ये केली.” अनिताने राजेश खन्नांबाबत एक मोठा दावा केला. “राजेश खन्नांनी मृत्यूपत्र बनवले होते, पण ते कसे गायब झाले मला माहीत नाही,” असं तिने सांगितलं.

‘जर आज राजेश खन्ना जिवंत असते तर त्यांची प्रतिक्रिया काय असती?’ असं विचारल्यावर अनिता म्हणाली, “मला खात्री आहे की त्यांना मी त्यांच्यासाठी खूप काही केलंय आणि माझं आयुष्य समर्पित केलंय याची जाणीव त्यांना असती. आता जे घडतंय ते सर्व पाहून त्यांना नक्कीच वाईट वाटलं असतं.”