Anjali Anand real height : सध्या गायक संजू राठोड याच्या ‘गुलाबी साडी’ गाण्याच्या हिंदी व्हर्जनची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘साडी’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून या गाण्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या हिंदी गाण्यामध्ये संजूसह रितेश देशमुख झळकत असून अजून एका अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रितेशसह ‘धमाल ४’मध्ये झळकणाऱ्या या अभिनेत्रीबद्दल सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिका विश्वातून चित्रपटांमध्ये झळकणारी ही अभिनेत्री म्हणजे अंजली आनंद. ‘धमाल ४’ चित्रपटामध्ये धमाल आणणाऱ्या अंजलीबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘धमाल ४’ चित्रपटामध्ये रितेश देशमुखसह अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा आणि जॉनी लिव्हर यांसारखे लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून यामध्ये अंजली आनंद हिचा अभिनय लक्ष वेधून घेत आहे. ती मागील अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वामध्ये सक्रिय असून मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. पण, तिला खरी लोकप्रियता २०१७ मध्ये आलेल्या ‘ढाई किलो प्रेम’ या मालिकेतून मिळाली. तिने साकारलेल्या दीपिका पुरी या भूमिकेतून अंजली घराघरांमध्ये ओळखली जाऊ लागली.
छोट्या पडद्यापासून सिनेमापर्यंत प्रवास
अंजली आनंद हिने ‘कुल्फी कुमार बाजेवाला’, ‘डब्बा कार्टेल’ आणि ‘रात जवान है’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यापासून सुरू झालेला अंजलीचा प्रवास आज सिनेमापर्यंत पोहचला आहे. अंजली ही ‘धमाल ४’मध्ये झळकणार आहे. यापूर्वी तिने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये तिने रणवीर सिंगच्या बहिणीची गायत्री रंधावा ही भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. त्यासह ‘खतरों के खिलाडी सीझन १३’ या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणूनही ती सहभागी झाली होती. आता पुन्हा एकदा ‘धमाल ४’ मधील ‘साडी’ आणि ‘चटणी’ या गाण्यामुळे अंजली आनंद चर्चेत आली आहे.
अंजली आनंद हिची उंची किती?
अंजली आनंद हिचा जन्म १२ जून १९९२ रोजी मुंबईमध्ये झाला. तिला अभिनयाचे बाळकडू घरातूनच मिळाले. तिचे वडील दिनेश आनंद हे देखील मनोरंजन क्षेत्राशी संबंधित होते. अंजली तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वासह आत्मविश्वासपूर्ण बॉडी पॉझिटिव्हिटीसाठी ओळखली जाते. नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली असून आज ती हिंदी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. विशेष म्हणजे, अंजलीची तब्बल ६ फूट उंची असून तिचे प्रभावी व्यक्तिमत्त्व सर्वांचे लक्ष वेधून घेते.
संजू राठोडचे ‘गुलाबी साडी’ गाण्याचे हिंदी व्हर्जन रिलीज
मराठमोळा गायक संजू राठोड याने आता बॉलीवूडमध्ये दमदार पाऊल टाकले असून त्याचे साडी गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचा प्रीमियर शो ठाण्यातील कोरम मॉलमध्ये पार पडला. यावेळी अभिनेत्री अंजली आनंदने गुलाबी रंगाची आकर्षक साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गुलाबी साडीतील तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. गाण्यावरील लोकप्रिय हूक स्टेप सादर करत तिने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. सोशल मीडियावर अंजलीच्या सौंदर्याची, स्टाइलची आणि अभिनयाची जोरदार चर्चा रंगली आहे. अंजली आनंदने झळकलेला ‘धमाल ४’ हा चित्रपट येत्या १० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
