काही कलाकारांना करिअरच्या सुरुवातीलाच मुख्य भूमिकेतून झळकण्याची संधी मिळते, तर काहींना त्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागते. असंच काहीसं झालं अभिनेत्री अंजली आनंदबरोबर. जी अलीकडे संजू राठोडने गायलेल्या ‘गुलाबी सीडी’ या गाण्यामुळे चर्चेत आली. यामधील तिच्या आणि रितेश देशमुखच्या केमिस्ट्रीने अनेकांचं लक्ष वेधलं. अशातच आता अभिनेत्रीने तिच्या शरीरयष्टीमुळे तिला झालेला त्रास, लोकांनी केलेली टीका आणि रितेश देशमुखबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
‘धमाल ४’मध्ये रितेश देशमुखबरोबर मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळवण्यासाठी अभिनेत्री अंजली आनंदला जवळपास दहा वर्षे वाट पाहावी लागली. ओटीटी आणि टीव्हीमधून करिअरची सुरुवात करणाऱ्या अंजलीला तिची उंची आणि वजन यामुळे अनेकदा नकारात्मक अनुभवांना सामोरं जावं लागलं. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंहच्या बहिणीची महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतरही तिच्याबद्दलचा लोकांचा दृष्टिकोण फारसा बदलला नाही. अंजली म्हणाली की, ‘धमाल ४’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तिच्या वजनावर करण्यात आलेल्या विनोदांबद्दलही अंजलीने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, हा चित्रपट अशाच प्रकारच्या विनोदी कथानकाचा भाग असल्यामुळे त्या विनोदांमुळे तिला वाईट वाटलं नाही आणि अशा कथेत काम करण्यास ती तयार होती. ‘धमाल’सारख्या लोकप्रिय फ्रँचायझीचा भाग बनल्यानंतर अंजली आनंद म्हणाली, “मी आजही विश्वास ठेवू शकत नाही की, मी धमाल ४चं शूटिंग पूर्ण केलं आहे. मला या प्रकारचे विनोदी चित्रपट खूप आवडतात. अशा संधीची मी अनेक दिवस वाट पाहत होते. गाण्यांवर नृत्य करण्याचीही माझी इच्छा होती. यापुढेही मला अशाच अनेक वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत.”
रितेश देशमुखचं केलं कौतुक
रितेश देशमुखबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अंजली आनंद म्हणाली, “रितेश गेली २३ वर्षे चित्रपटसृष्टीत काम करत आहे. तो खूप चांगला आणि “त्यांच्यासारखे लोक क्वचितच भेटतात…”, ‘गुलाबी साडी’ फेम अभिनेत्रीने केलं रितेश देशमुखचं कौतुक; म्हणाली, “मनमिळावू स्वभावाचा…” माणूस आहे. मला रितेश आणि जिनिलिया दोघेही खूप आवडतात. त्यांच्यासारखे सकारात्मक लोक क्वचितच भेटतात. रितेशबरोबर काम करताना खूप मजा आली. आमच्यातील केमिस्ट्रीही अगदी सहज जुळली. इंद्र कुमार सर सेटवरील वातावरण नेहमी आनंदी ठेवतात. अजय देवगणबरोबर काम करण्याचा अनुभवही खूप छान होता. जावेद जाफरी सर अप्रतिम आहेत, तर अरशद वारसी सर्वांत विनोदी व्यक्ती आहेत. रवी किशन आणि संजीदा शेखसोबतही काम करताना खूप धमाल आली. या चित्रपटाचा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे. ‘धमाल ४’ पाहिल्यानंतर अधिक दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मीही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचू शकते, हे त्यांना पटावं, अशी माझी इच्छा आहे.”
‘धमाल ४’ ही मोठी संधी असली तरी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अंजली आनंदच्या वजनावर पुन्हा विनोद करण्यात आले आहेत. याबद्दल बोलताना अंजली म्हणाली, “लोक मला नेहमी विचारतात की, तू शरीरयष्टीवरुन खिल्ली उडवणाऱ्यांच्या विरोधात बोलतेस, मग अशा चित्रपटात काम कसं केलंस? पण हीच आपल्या समाजाची वस्तुस्थिती आहे. मी स्वतःला सिद्ध केल्यानंतरही लोक माझी खिल्ली उडवत आहेत. आजही सोशल मीडियावर मला ट्रोल केलं जातं. किस भैंस को ले लिया, रितेशचे इतके वाईट दिवस सुरू आहेत का की हिच्याबरोबर काम करावं लागलं?, इंडस्ट्रीत नायिका नाहीत का? अशा प्रकारच्या कमेंट्स मला अजूनही वाचायला मिळतात. जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत चित्रपटांच्या कथा आणि पटकथाही बदलणार नाहीत.”
