Nitesh Tiwari Ramayana: बॉलrवूड दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ या भव्य चित्रपटाची पहिली झलक समोर आल्यापासूनच याची जोरदार चर्चा आहे. ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी हिच्या कास्टिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “या देशात सीतेला आईच्या रूपात पूजले जाते, त्यामुळे कलाकारांची निवड करताना धार्मिक भावनांचा विचार करायला हवा होता,” असे म्हणत अन्नू कपूर यांनी निर्मात्यांवर टीका केली आहे. तसेच हा चित्रपट रामानंद सागर यांच्या जुन्या मालिकेची फक्त तंत्रज्ञानाने प्रगत आवृत्ती असेल, असेही ते म्हणाले.
‘झूम’शी बोलताना अन्नू कपूर यांनी हा चित्रपट सध्या कोणत्या टप्प्यावर आहे असा प्रश्नही केला. हा चित्रपट रिलीज झाला आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी साई पल्लवीच्या कास्टिंगवर मत मांडलं. अशा ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या पात्रांशी जोडलेले धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन निर्मात्यांनी कलाकारांना घेताना अधिक काळजी घ्यायला हवी, असं त्यांनी म्हटलं.
साई पल्लवीच्या निवडीबद्दल अन्नू कपूर म्हणाले…
अन्नू कपूर म्हणाले, “तुम्ही सीतेची भूमिका करण्यासाठी कोणाला निवडलंय, तेही तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. सीतेला आईच्या रूपात पूजले जाते. या देशातील लोक प्रभू रामाला भगवान नारायणाचे अवतार मानून पूजतात. त्यामुळे या चित्रपटातील कलाकार प्रश्न उपस्थित करण्यासारखेच आहेत. आधी चित्रपट रिलीज होऊ द्या, मग पाहू.”
या चित्रपटात मूळ कथेत काहीही नवीन असे असं अन्नू कपूर यांना वाटत नाही. हा चित्रपट रामानंद सागर यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिकेची फक्त तंत्रज्ञानाने प्रगत आणि भव्य आवृत्ती असेल. “ते काहीही बनवू दे, ते रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेला फक्त तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अपग्रेड करतील आणि कदाचित त्याची भव्यता वाढवतील. तुम्हाला काय वाटतं, ते काय वेगळं बनवणार आहेत?” असं अन्नू कपूर म्हणाले.
रामायणमधील कलाकार
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. यश रावणाची भूमिका साकारत आहे, तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आहे. तसेच, रवी दुबे -लक्ष्मण, लारा दत्ता – कैकेयी, रकुल प्रीत सिंग -शूर्पणखा, काजल अग्रवाल -मंदोदरी आणि अरुण गोविल -राजा दशरथ यांची भूमिका साकारणार आहेत. विवेक ओबेरॉय, कुणाल कपूर, आदिनाथ कोठारे आणि मोहित रैना हे देखील या चित्रपटात आहेत.
रामायण चित्रपटाचे बजेट व रिलीज
सुमारे ४,००० कोटी रुपयांच्या बजेटसह बनवला जाणारा ‘रामायण’ हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट आहे. या प्रोजेक्टसाठी ऑस्कर विजेते संगीतकार हन्स झिमर आणि ए. आर. रहमान एकत्र संगीत देत आहेत. चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये रिलीज होणार आहे, तर दुसरा भाग २०२७ मध्ये चित्रपटगृहात येण्याची शक्यता आहे.
