Shah Rukh Khan Last Superstar: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान हा अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ९०च्या दशकापासून सुरू झालेला शाहरुखचा सिनेविश्वातील प्रवास आजही यशस्वीरीत्या सुरू आहे. त्याच्या खास अभिनयाच्या शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. शाहरुख खान हा नक्कीच एक सुपरस्टार आहे; पण एका जुन्या मुलाखतीमध्ये शाहरुख स्वतःला ‘शेवटचा सुपरस्टार’ म्हणाला होता. २०१४ साली केलेल्या वक्तव्यावर अनेक वर्षांनंतर अन्नू कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे वक्तव्य चुकीचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अन्नू कपूर यांनी सिनेविश्वातील अनुभव शेअर केले. यावेळी त्यांनी शाहरुखच्या ‘शेवटचा सुपरस्टार’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी शाहरुखचे थेट नाव न घेता त्याच्या करिअरची अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रियतेशी तुलना केली. तसेच कोणत्याच कलाकाराला अशा प्रकारे शेवटचा सुपरस्टार म्हणता येणार नाही, अशी भूमिका घेतली.
अन्नू कपूर काय म्हणाले?
अन्नू कपूर म्हणाले, “मागील काही वर्षांपासून मीडियाच्या माध्यमातून एक अभिनेता हा शेवटचा सुपरस्टार असल्याचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. राजेश खन्ना यांच्या काळातही असंच बोललं जात होतं. पण, जर मागे वळून पाहिलं तर त्यानंतर अनेकांनी सिनेविश्वामध्ये यशस्वी वाटचाल केली. या इंडस्ट्रीत अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासारखी प्रदीर्घ यशस्वी कारकीर्द दुसऱ्या कुणालाही घडवता आलेली नाही. इतकी वर्षे प्रसिद्धी आणि यश टिकवून ठेवणं ही खूप अवघड गोष्ट आहे.”
शाहरुख खानचं नाव न घेता अन्नू कपूर म्हणाले, “ज्या अभिनेत्याबद्दल तुम्ही बोलत आहात, त्याने १९९२ च्या सुमारास सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. म्हणजे त्याला इंडस्ट्रीमध्ये सुमारे ३४ वर्षे झाली आहेत. अमिताभ बच्चन यांच्या ५३ वर्षांच्या सिनेविश्वातील करिअरमधून ही ३४ वर्षे वजा केली, तरी अजून १९ वर्षे उरतात. आता हा अभिनेता पुढील १९ वर्षे तितकाच लोकप्रिय राहील, असं तुम्हाला वाटतं का? मी मुद्दाम त्याचं नाव घेत नाही. २०४५ मध्येही तो तितकाच लोकप्रिय असेल असं मला वाटत नाही.”
पुढे अन्नू कपूर यांनी शाहरुखच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक केलं. ते म्हणाले, “शाहरुख खान हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत श्रीमंत अभिनेता आहे, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. मी त्याच्याबद्दल इतकंच ऐकलं आहे की, तो एक खूप चांगला वडील, पती आणि भाऊ आहे. लोकांनी त्याची हीच ओळख लक्षात ठेवली पाहिजे. सुपरस्टार येतात आणि जातात, पण आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा माणूस असणं, हीच त्याची सर्वात मोठी कामगिरी आहे.”
शाहरुख खानशी काहीही संबंध नाही – अन्नू कपूर
एकत्र काम करण्याच्या अनुभवाबद्दल विचारताच अन्नू कपूर म्हणाले, “मी त्याच्याबरोबर कधीच काम केलं नाही.” त्यानंतर त्यांना यश चोप्रा दिग्दर्शित १९९३ मधील ‘डर’ सिनेमाची आठवण करून दिल्यावर ते म्हणाले, “मला आठवत नाही, त्यावेळी तो अगदी नवीन होता. आमच्यात काय बोलणं झालं होतं हेही मला आठवत नाही. यश चोप्रा यांनी मला हा चित्रपट करण्यास सांगितलं होतं. माझं फक्त तीन दिवसांचं शूटिंग होतं आणि त्या चित्रपटात माझा फारसा सहभाग नव्हता. त्याला माझ्याबरोबर काम केल्याचं आठवतं का आणि त्यानं माझ्याकडून काही शिकलं का, हे तुम्ही त्यालाच विचारा. माझा शाहरुख खानशी काहीही संबंध नाही आणि ज्याच्याशी माझा काही संबंध नसतो, त्याला मी फक्त शुभेच्छा देतो.”
