Annu Kapoor Shocking Revelations: चित्रपटांमधील रोमँटिक आणि इंटीमेट सीनचे चित्रीकरण अनेकदा वादाचे कारण ठरते. नुकत्याच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी एका अभिनेत्याच्या गैरवर्तणुकीचा पर्दाफाश केला आहे. एका चित्रपटाच्या सेटवर इंटीमेट सीन शूट करताना हिरो इतका वाहवत गेला की दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही तो थांबला नाही, ज्यामुळे संबंधित अभिनेत्री प्रचंड दहशतीत होती, असा खळबळजनक दावा कपूर यांनी केला आहे. याशिवाय, ‘७ खून माफ’ चित्रपटाच्या वेळी प्रियांका चोप्राने त्यांच्यासोबत किसिंग सीन करण्यास का नकार दिला होता त्याबद्दल भाष्य केलं होतं.

इंटीमेट सीन दरम्यान हिरोचं नियंत्रण सुटलं अन्…

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अन्नू कपूर यांनी सांगितलं की, एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी एका अभिनेत्याने स्वतःवरील नियंत्रण गमावलं होतं. ते म्हणाले, “अशाच एका सीनच्या शूटिंग दरम्यान हिरो वाहवत गेला. दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही तो थांबला नाही. त्या अभिनेत्रीला स्वतःला सोडवण्यासाठी धडपड करावी लागली. ती इतकी घाबरली होती की पुढचे दोन दिवस ती आपल्या खोलीबाहेर आली नाही.”

अन्नू कपूर यांनी ही घटना कोणत्या कलाकारांबरोबर घडली, याबद्दल सांगितलं नाही. अभिनेता व अभिनेत्री दोघांचंही नाव अन्नू कपूरनी घेतलं नाही. पण जर ती अभिनेत्री ही मुलाखत पाहत असेल, तर ती त्यांच्या या विधानाशी नक्कीच सहमत असेल, असा दावा त्यांनी केला.

काही कलाकार सीनचा गैरफायदा घेतात

अन्नू कपूर यांनी पुढे सांगितलं की, असे अनेक प्रसंग घडतात जिथे कलाकार इंटीमेट सीनच्या चित्रीकरणादरम्यान परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणाले, “इंटीमेट सीन दरम्यान हिरो इतके उत्तेजित होतात की दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यावरही ते थांबत नाहीत, असं मी अनेकदा पाहिलं आहे. अनेकजण अशा सीनचा गैरफायदा घेतात, पण मी स्वतः असं कधीच केलं नाही.”

प्रियांका चोप्रा ‘किसिंग सीन’साठी नव्हती तयार

अन्नू कपूर यांनी विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘७ खून माफ’ चित्रपटातील प्रियांका चोप्राबरोबरचा एक अनुभवही शेअर केला. त्यांनी खुलासा केला की, चित्रपटात एक किसिंग सीन होता, परंतु प्रियांका तो करण्यासाठी कंफर्टेबल नव्हती. “विशालचं म्हणणं होतं की हा सीन एका खास कारणासाठी लिहिला गेला आहे, त्यामुळे तो शूट करावाच लागेल. नंतर त्यांच्या टीमने मला सांगितलं की प्रियांका या सीनसाठी तयार नाही. मी त्यावर कोणताही वाद घातला नाही, पण कशी कोण जाणे ही गोष्ट सगळीकडे पसरली.”

प्रियांका चोप्राबरोबरच्या किसिंग सीनसंदर्भात अन्नू कपूर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद झाला होता. मी हिरो असतो, तर प्रियांकाने हा सीन केला असता, असं ते म्हणाले होते. त्यानंतर प्रियांका चोप्रानेही या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.