‘७ खून माफ’ चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट फक्त कमाईमुळेच नव्हे, तर प्रियांका चोप्राच्या अभिनयामुळेही गाजला होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच एका वादाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनेते अन्नू कपूर यांनी दावा केला होता की, प्रियांकाने त्यांना किस करण्यास नकार दिला होता, कारण ते मोठे हिरो किंवा दिसायला खूप देखणे नव्हते. तो सीन चित्रपटात ठेवण्यात आला होता, तरीही या विधानामुळे चित्रपटसृष्टीतील महिलांचा कंफर्ट आणि सौंदर्याचे निकष यावर मोठी चर्चा रंगली होती.
आता तब्बल १५ वर्षांनंतर अन्नू कपूर यांनी या वादावर पुन्हा भाष्य केलंय. तसेच हे वक्तव्य का केलं, त्याचं स्पष्टीकरणही दिलं. सिद्धार्थ कन्नन यांच्याशी बोलताना अन्नू कपूर म्हणाले, “दुसरं काय असू शकतं? माझ्या लूकपेक्षा मोठी अडचण ही होती की मी ‘हिरो’ नाहीये. मला नक्की माहित नाही की काय झालं होतं. जेव्हा आम्ही विशाल भारद्वाज यांच्या ‘७ खून माफ’ चित्रपटात एकत्र काम करत होतो, तेव्हा अनेक पत्रकार मला वारंवार विचारत होते की प्रियांकाने मला किस करण्यास नकार दिला का? ही साधारण १६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अशाच एका मुलाखती दरम्यान कोणीतरी मला विचारले की तिने मला किस का केलं नाही, तेव्हा मी म्हटलं, ‘ती तिची मर्जी आहे.’ ते पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत होते आणि मी वैतागून म्हणालो, कदाचित मी एखादा मोठा स्टार असतो, तर तिने नकार दिला नसता.”
आम्हाला तो सीन करावाच लागला – अन्नू कपूर
अन्नू कपूर पुढे म्हणाले, “या गोष्टीचा माझ्यावर कधीच परिणाम झाला नाही, मी त्याकडे दुर्लक्ष केलं. विशाल भारद्वाज यांनी मला सांगितलं होतं की, प्रियांका माझ्याबरोबरच्या ‘किसिंग सीन’बद्दल साशंक होती. मी तिला ‘बेटा’ म्हणायचो, कारण सेटवर तिचे वडील आणि माझे खूप चांगले संबंध होते. ‘मिस वर्ल्ड’ जिंकल्यानंतर ती ‘अंताक्षरी’मध्येही आली होती. त्यामुळे जेव्हा मला सांगण्यात आलं की ती या सीनसाठी कंफर्टेबल नाही, तेव्हा मी म्हणालो, ‘हे साहजिकच आहे.’ मी तो सीन काढून टाकण्याचा सल्लाही दिला होता, पण विशाल यांनी त्याला नकार दिला. आम्हाला तो सीन करावाच लागला. कलाकार कॅमेऱ्यासमोर अस्वस्थ दिसू शकत नाहीत, त्यामुळे आम्ही तो सीन अतिशय व्यावसायिक पद्धतीने पूर्ण केला.”
या चित्रपटात अन्नू कपूर यांनी प्रियांका चोप्राच्या सात पतींपैकी एकाची भूमिका साकारली होती. रस्किन बाँड यांच्या ‘सुझान्हाज सेव्हन हसबंड्स’ या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात इरफान खान, नसीरुद्दीन शाह, जॉन अब्राहम, नील नितीन मुकेश आणि अलेक्झांडर डियाचेन्को यांनीही काम केलं होतं.
प्रियांका चोप्रा अन्नू कपूरवर संतापलेली
२०११ मध्ये प्रियांका चोप्राने अन्नू कपूर यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ती म्हणाली होती, “जर त्यांना अशा प्रकारचे इन्टीमेट सीन करायचे असतील आणि घाणेरड्या कमेंट्स करायच्या असतील, तर त्यांनी तसलेच चित्रपट करावेत. अशा प्रकारचे सीन आमच्या चित्रपटाचा भाग कधीच नव्हते. मी या सगळ्यामुळे खूप चिडले आहे. मला नाही वाटत की त्यांना असं बोलणं शोभतंय. त्यांच्या बोलण्यामुळे मी दुखावली जाईन, असं त्यांना वाटलं नसेल पण खरोखर मला खूप वाईट वाटलं. त्यांनी अशा पद्धतीने बोलणं चुकीचं होतं.”
अन्नू कपूर यांनी दावा होता की, प्रियांकाने त्यांच्यासोबत इन्टीमेट सीन करण्यास नकार दिला कारण ते दिसायला चांगले किंवा हिरो नव्हते. “तिला हिरोंसोबत इन्टीमेट सीन करण्यास काही अडचण नसती. जर टॅलेंटला महत्त्व नसेल, तर मग तुम्हाला फक्त दिसायला चांगलं असणं गरजेचं आहे असं मला वाटतं,” असं वक्तव्य अन्नू कपूर यांनी केलं होतं.
