Anshula Kapoor Rohan Thakkar Wedding : लोकप्रिय बॉलीवूड दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी अंशूला कपूर हिने सोमवारी (६ जुलै रोजी) बॉयफ्रेंड रोहन ठक्कर याच्याशी लग्न केले. कपूर घराण्यातील या लग्नाची सिनेविश्वामध्ये जोरदार चर्चा आहे. अंशूलाच्या लग्नात तिचा भाऊ अर्जुन कपूर आणि बहिणी, जान्हवी कपूर, खुशी कपूर व सोनम कपूर या सर्वांच्या लूकने लक्ष वेधून घेतले. आता अंशूलाने तिच्या लग्नाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिला नवरी म्हणून पाहताच रोहनने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
अंशूला कपूरने शेअर केलेल्या व्हिडीओत तिची एन्ट्री, तिच्या स्वागताला सोनम, जान्हवी व खुशी कपूर यांनी केलेली फुलांची उधळण, वरमाला सोहळा, सात फेरे असे लग्नातील अनेक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळतात. व्हिडीओची सुरुवात एका पत्राने होते. रोहनने अंशूलासाठी स्वतः हाताने पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहे. यानंतर तिला वधूच्या रुपात पाहून रोहन आश्चर्यचकित होतो. रोहनची ही प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल होत आहे.
अंशूलच्या लग्नातील विधीची झलक
अंशूलाला तिचा भाऊ अर्जुन कपूर लग्न मंडपात आणतो. पुढे भावुक झालेले बोनी कपूर तिला मंडपात नेतात. यानंतर नोंदणी आणि पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीने अंशूला व रोहन यांचे लग्न होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि प्रेम व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. यावेळी कुटुंबीयांनी नवविवाहित जोडप्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांना आशीर्वाद दिले. अंशूलाचे काका अनिल कपूर, बहीण जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि इतर कुटुंबीयही या सोहळ्यात सहभागी झाले होते. व्हिडीओच्या शेवटी रोहन अंशूलाच्या भांगेत कुंकू भरतानाचा सुंदर क्षण पाहायला मिळतो. यानंतर कपूर व ठक्कर कुटुंबाचा एकत्रित फोटोने व्हिडीओचा शेवट होतो. लग्नातील प्रत्येक विधीची झलक या व्हिडीओत पाहायला मिळते. नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अंशूला व रोहनला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अंशूला कपूर व रोहन ठक्कर यांचे लग्न मुंबईतील ‘ताज लँड्स एंड’ इथे पार पडले. या विवाह सोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र-मैत्रिणींची उपस्थिती होती. यावेळी नववधू अंशूला कपूरने गुलाबी आणि सोनेरी रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. तिने तिच्या आईची ४२ वर्षे जुनी भरजरी ओढणी घेतली होती. त्याचबरोबर बहिणीच्या लग्नात करवली असलेल्या जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्या ग्लॅमरस लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
