अभिनेत्री अनु अगरवाल ही ९० च्या काळात एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आली होती. अनु अगरवालने महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानं त्या काळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामध्ये अनु अगरवाल राहुल रॉयबरोबर झळकली होती. हा तिचा पहिलाच चित्रपट होता आणि महेश भट्ट यांनी त्या चित्रपटाचं प्रमोशन हटके पद्धतीनं केलं होतं.
अनु अगरवालच्या ‘आशिकी’ चित्रपटाचं पोस्टर त्या काळी प्रचंड प्रसिद्ध झालं होतं. परंतु, त्या पोस्टरवर अनु अगरवाल व सहकलाकार राहुल रॉय यांचे चेहरे न दाखवता, फक्त दोघांच्या चेहऱ्यावर कोट असलेला मोठा फोटो होता. अनु अगरवलानं ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याबाबत सांगितलं आहे. ती म्हणाली, “चित्रपटाच्या पोस्टरपेक्षाही माझ्या चेहऱ्याचा क्लोज-अप त्या प्रत्येक पोस्टरवर दिसत होता आणि मुंबईतील बऱ्याच ठिकाणी ते लावण्यात आलं होतं.”
याबाबत बोलताना पुढे ती म्हणाली. “त्या गाजलेल्या पोस्टरवर या चेहऱ्यामुळे गर्दी वाढू शकते, अशी टॅगलाइन लिहिण्यात आली होती. पण माझा चेहरा आधीच लोकांना माहीत होता. कारण- मी हा चित्रपट करण्यापूर्वी मॉडलिंग करायचे.” दरम्यान, त्यासह अनु अगरवालनं दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चनबद्दलचाही किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली, “मी एका मासिकासाठी अमिताभ बच्चन यांच्यासह चित्रीकरण करीत होते. तेव्हा अमिताभ बच्चन २० मिनिटं उशिरा आले होते.”
अमिताभ यांच्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “उशिरा आल्यामुळे त्यांनी आल्या आल्या माझी माफी मागितली आणि म्हणाले की, मी काय करणार होतो तुझ्या पोस्टरमुळे बाहेर एवढी गर्दी वाढली की ट्रॅफिक जॅम झालं.” याच मुलाखतीमध्ये अनु अगरवालनं तिच्या ‘आशिकी’ या गाजलेल्या चित्रपटाचं पूर्ण मानधन मिळालं नसल्याचा खुलासा केला आहे.
दरम्यान, अनु अगरवालच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं आजवर ‘आशिकी’, ‘गजब तमाशा’, ‘किंग अंकल’, ‘खाल-नायका,’ ‘जनम कुंडली’ यांसारख्या चित्रपटांतून काम केलं आहे. तसेच, तिनं आजवर अमिताभ बच्चन, शाहरुख खान, विनोद खन्ना यांसारख्या अभिनेत्यांसह चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर त्या काळी ती अभिनयासह मॉडलिंगही करायची. त्यावेळी ती प्रसिद्ध मॉडेल म्हणूनही नावारूपाला आली होती.