Ajay Devgan Anubhav Sinha Didn’t talk for 18 years : बॉलीवूडमध्ये वाद नवीन नाहीत. बरेच कलाकार काही कारणास्तव एकमेकांशी बोलत नाहीत. सलमान खान व शाहरुख खान यांच्यातही काही वर्षे अबोला होता. खरं तर एखादा चित्रपट फ्लॉप झाला की त्याच्या अपयशाची जबाबदारी कलाकारांवर नाही, तर दिग्दर्शकावर जास्त असते. अशाच एका दिग्दर्शकाचा चित्रपट फ्लॉप झाला आणि अजय देवगणने त्याच्याशी बोलणं सोडलं. या दिग्दर्शकाने स्वतः याबद्दल खुलासा केला आहे.
या दिग्दर्शकाचं नाव अनुभव सिन्हा. अनुभव सिन्हा यांनी Ra. One, मुल्क, आर्टिकल 15 असे अनेक वेगळ्या धाटणीचे चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. पण त्यांनी त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट अजय देवगणबरोबर केला होता. महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर अजय देवगण व अनुभव सिन्हा एकमेकांशी बोलत नाहीत. या गोष्टीला आता १८ वर्षे झाली असून सिन्हांनी स्वतः ही माहिती दिली आहे.
करिअरमधील सर्वात वाईट चित्रपट – अनुभव सिन्हा
हे सगळं ज्या चित्रपटामुळे घडलं त्याचं नाव आहे ‘कॅश’. हा चित्रपट फ्लॉप झाल्याचा अनुभव सिन्हा व अजय देवगणच्या नात्यावर परिणाम झाला आणि दोघेही परत कधीच भेटले नाहीत. उल्टा चष्मा (यूसी) या यूट्यूब चॅनलशी बोलताना अनुभव म्हणाले, “अजय देवगण खूप चांगला माणूस आहे. पण कधीकधी चित्रपट चालत नाहीत, तेव्हा एकत्र काम करणाऱ्या टीम वेगळ्या होतात. मी अजयबरोबर माझ्या करिअरमधील सर्वात वाईट चित्रपट ‘कॅश’ बनवला. तो खरंच खूप वाईट चित्रपट आहे. टीममधील लोकांना त्याबद्दल नाराज व्हायचा पूर्ण अधिकार आहे. तो बेजबाबदारपणाने बनवलेला चित्रपट होता. त्या चित्रपटानंतर अजय आणि मी वेगळे झालो. आम्हाला पुन्हा कधीही एकमेकांना भेटण्याची संधी मिळाली नाही.”
मी त्याला मेसेज केले पण…
अजय देवगण मागील १८ वर्षांपासून बोलत नसल्याचं द लल्लनटॉपशी बोलताना अनुभव सिन्हांनी सांगितलं. “आम्ही कधीच भांडलो नाही. पण तो माझ्याशी बोलत नाही आणि मला त्याचं कारणही माहित नाही. आम्ही ‘कॅश’ सिनेमा बनवल्यानंतर भेटलोच नाही, त्यामुळे तो माझ्याकडे दुर्लक्ष करतोय असंही मी म्हणू शकत नाही. कदाचित मी जास्त विचार करत असेन. मी त्याला अनेक मेसेज केले, पण त्याने कधीच उत्तर दिलं नाही. म्हणून मी स्वतःला समजावलं की कदाचित माझे मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचलेच नसतील. पण १८ वर्षे झाली आहेत, आम्ही बोललो नाही,” असं अनुभव सिन्हा म्हणाले.
अनुभव सिन्हा आणि अजय देवगण यांनी २००७ मध्ये ‘कॅश’ (Cash) नावाचा एक चित्रपट एकत्र केला होता. या सिनेमात अजय देवगण, सुनील शेट्टी, ईशा देओल, रितेश देशमुख, झायेद खान, शमिता शेट्टी, आयशा टाकिया आणि दिया मिर्झा हे कलाकार होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि यामुळे अनुभव सिन्हा व अजय देवगण यांच्यातील संबंध ताणले गेले.

