Ajay Devgan not talking to Anubhav Sinha for 20 years : बॉलीवूडमध्ये कलाकारांमधील वाद आणि दुरावा नवीन नाही. सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वादाची चर्चा आजही केली जाते. असाच एक मोठा दुरावा अभिनेता अजय देवगण आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यात गेल्या दोन दशकांपासून पाहायला मिळत आहे. अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेला ‘कॅश’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दारुण अपयशी ठरला होता. त्यानंतर अजय देवगणने त्यांच्याशी सर्व संबंध तोडले. “मी माझ्या करिअरमधील सर्वात वाईट चित्रपट अजयसोबत बनवला,” अशी कबुली स्वतः अनुभव सिन्हा यांनी दिली.
अनुभव सिन्हा हे बॉलीवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ते Ra. One, मुल्क, आर्टिकल १५ या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी दिग्दर्शित केलेले सगळेच चित्रपट हिट झालेत असं नाही. काही फ्लॉपही झाले, पण त्यातला सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट त्यांनी अजय देवगणबरोबर केला होता. हा त्यांनी एकत्र केलेला शेवटचा चित्रपट ठरला. इतकंच नाही तर तेव्हापासून अजय देवगणने अनुभव सिन्हांशी बोलणं सोडलं. या गोष्टीला आता २० वर्षे झाली आहेत.
अनुभव सिन्हा व अजय देवगणचा चित्रपट कोणता?
अनुभव सिन्हा यांनी अजय देवगणबरोबर ‘कॅश’ नावाचा चित्रपट केला होता. या चित्रपटाचं काहींनी नावंही ऐकलं नसेल, तर काहींना आठवतही नसेल की या नावाचा कोणता चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला आणि अनुभव सिन्हा व अजय देवगण व्यावसायिक नात्याचा, किंबहुना मैत्रीचा शेवट झाला.
“अजय देवगण खूप चांगला माणूस आहे. पण कधीकधी चित्रपट चालत नाहीत, त्यानंतर एकत्र काम करणाऱ्या टीम कायमच्या वेगळ्या होतात. मी अजयबरोबर माझ्या करिअरमधील सर्वात वाईट चित्रपट ‘कॅश’ बनवला. तो खरंच खूप वाईट चित्रपट आहे. त्यामुळे अजयला त्याबद्दल नाराज व्हायचा पूर्ण अधिकार आहे. तो अत्यंत बेजबाबदारपणाने बनवलेला चित्रपट होता. त्या चित्रपटानंतर अजय आणि मी वेगळे झालो. आम्हाला पुन्हा कधीही एकमेकांना भेटण्याची संधी मिळाली नाही,” असं उल्टा चष्मा या यूट्यूब चॅनलशी बोलताना अनुभव म्हणाले.

अजय देवगण माझ्याशी बोलत नाही, मेसेजला उत्तर देत नाही – अनुभव सिन्हा
द लल्लनटॉपशी बोलताना अनुभव सिन्हा म्हणाले, “आम्ही कधीच भांडलो नाही. पण तो माझ्याशी बोलत नाही आणि मला त्याचं कारण माहीत नाही. ‘कॅश’ सिनेमा बनवल्यानंतर आम्ही भेटलोच नाही, त्यामुळे तो माझ्याकडे दुर्लक्ष करतोय असंही मी म्हणू शकत नाही. कदाचित मी जास्त विचार करत असेन. मी त्याला अनेकदा मेसेज केले, पण त्याने कधीच उत्तर दिलं नाही. म्हणून मी स्वतःला समजावलं की कदाचित माझे मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचलेच नसतील. पण आम्ही शेवटचं बोललो त्याला २० वर्षे झाली आहेत.”
अनुभव सिन्हा दिग्दर्शित कॅश सिनेमा २००७ मध्ये रिलीज झाला होता. यात कलाकारांची मांदियाळी होती. अजय देवगण, सुनील शेट्टी, ईशा देओल, रितेश देशमुख, झायेद खान, शमिता शेट्टी, आयशा टाकिया आणि दिया मिर्झा हे कलाकार या चित्रपटात होते.
