Anupam Kher first Marriage Reason Raju Kher Interview: बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर हे त्यांच्या चित्रपटांमुळे अनेकदा चर्चेत असतात. पण, आता अनुपम यांचे भाऊ अभिनेते राजू खेर यांनी अनुपम यांच्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. अनुपम खेर यांनी अभिनेत्री मधुमालती कपूर यांच्याबरोबर लग्न केले होते. मात्र, एकाच वर्षात त्यांचा संसार मोडला होता. तसेच लग्न झाल्यानंतर अवघ्या एक-दोन दिवसांतच अनुपम खेर यांना हे लग्न टीकणार नसल्याचे लक्षात आल्याचे राजू खेर यांनी स्पष्ट केले.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राजू खेर यांनी अनुपम खेर यांचे लखनऊच्या मंदिरात झालेले पहिले लग्न आणि दोन दिवसांत अनुपम निघून गेल्याबद्दल सांगितले. राजू खेर म्हणाले, लग्नाआधी अनुपम खेर आणि मधुमालती कपूर हे दोन-तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर मधुमालती यांनी लग्न करण्याबद्दल विचारले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अगदी दुसऱ्या दिवशी लग्न करण्याचे ठरवले.

मी इथे राहू शकत नाही – अनुपम

पण, लग्नानंतर अनुपम खेर यांना त्यांचे नाते टिकवणे शक्य नसल्याचे जाणवले होते. राजू म्हणाले, “अनुपम हे एक-दोन दिवस तिथे राहिले असतील आणि त्यानंतर अनुपम निघून गेले. अनुपम म्हणाले, ‘मी इथे राहू शकत नाही.’” अनुपम काही दिवस शिमल्याला गेले आणि त्यानंतर दिल्लीला गेले. त्यावेळी अनुपम बॉलीवूडमध्ये काम करत नव्हते, ते लखनऊमध्ये राहत होते, मात्र नंतर सिनेविश्वात करिअर करण्यासाठी ते मुंबईला आले.

अनुपम खेर लग्नानंतर इतक्या लवकर निघून गेल्याचे घरातील लोकांना सुरुवातीला लक्षात आले नाही. कारण लग्नाबद्दलही त्यांना सुरुवातीला माहीत नव्हते, त्यामुळे अनुपम निघून गेलेल्या परिस्थितीचे गांभीर्य कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही. कारण या लग्नाबद्दलही घराच्यांना माहीत नव्हते.

अनुपम खेर

अनुपम खूप साधे आणि सरळ – राजू खेर

पुढे राजू म्हणाले, “अनुपम आणि मधुमालती यांच्या नात्यात नेमकं काय बिनसलं, याबद्दल मी शोध घेण्याचा प्रयत्नही कधी केला नाही. त्या काळात अनुपम खूप साधे आणि सरळ होते, तर मधुजी खंबीर व कणखर स्त्री होत्या, त्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये नेमकं काय झालं हे फक्त त्यांनाच माहीत होते. मलाही त्याबाबत जाणून घेण्याची इच्छा नव्हती. मला वाटलं हे त्या दोघांचे आयुष्य आहे आणि त्यांना ते जगायचं आहे. त्यांना कधी माझी गरज भासली तर भाऊ म्हणून मी कायम त्यांच्याबरोबर असेन.”

अनुपम व किरण खेर यांचे लग्न

दरम्यान, मधुमालती कपूर यांनी नंतर लेखक-दिग्दर्शक रंजित कपूर यांच्याशी लग्न केले होते; तर अनुपम खेर यांनी १९८५ मध्ये अभिनेत्री किरण खेर यांच्याशी लग्न केले.