Anupam Kher gives his name to stepson: अनुपम खेर यांनी आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांचे अनेक सिनेमे गाजले. मात्र, जेव्हा ते कामासाठी मुंबईत आले, त्यावेळी त्यांच्याकडे फक्त ३७ रुपये होते.
अनुपम खेर यांना करावा लागलेला कामासाठी संघर्ष
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की जेव्हा ते शिमल्याहून मुंबईत आले, त्यावेळी त्यांच्याकडे फक्त ३७ रुपये होते. त्याआधीच त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून प्रशिक्षण घेतले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांना काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. सतत नकार मिळूनही ते प्रयत्न करत राहिले. १९८४ ला त्यांनी ‘सारांश’ या सिनेमातून पदार्पण केले.

अभिनेत्याचं लग्न एका दिवसात मोडलेलं
‘सारांश’ सिनेमात त्यांनी एका ६५ वर्षीय व्यक्तीची भूमिका साकारली होती, त्यावेळी ते फक्त २८ वर्षांचे होते. ही भूमिका साकारण्यासाठी त्यांनी जवळजवळ ६ महिने तयारी केली होती. पण, शूटिंगच्या १० दिवस आधी ती भूमिका लोकप्रिय अभिनेते संजीव कुमार साकारणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. जेव्हा त्यांना हे समजले, त्यावेळी त्यांना राग आला. त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, जाण्याआधी ते सिनेमाचे दिग्दर्शक महेश भट्ट यांना भेटण्यासाठी गेले. महेश भट्ट यांनी ती भूमिका पुन्हा अनुपम खेर यांना दिली.
अनुपम खेर यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अनुपम खेर यांचे लग्न झाले होते. लखनऊमधील एका मंदिरात अनुपम खेर यांनी मधुमालती कपूर यांच्याशी लग्न केले होते. अनुपम खेर यांचे भाऊ राजू खेर यांनी याबद्दल वक्तव्य केले होते. लग्नाआधी अनुपम खेर आणि मधुमालती दोन ते तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अनुपम खेर यांनी मधुमालती यांना सांगितले की ते थांबू शकत नाहीत. राजू खेर यांनी एका दिवसात संपलेले लग्न असे अनुपम खेर यांच्या पहिल्या लग्नाचे वर्णन केले.

किरण खेर व अनुपम खेर यांची ओळख नाटकात काम करताना झाली होती. त्यावेळी किरण यांचे गौतम बेरी या उद्योजकाशी लग्न झाले होते. त्यांना सिंकदर हा मुलगा होता. त्यावेळी अनुपम खेरही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, कालांतराने किरण खेर यांचे पहिले लग्न मोडले. त्यानंतर किरण खेर व अनुपम खेर एकमेकांच्या प्रेमात पडले. १९८५ ला त्यांनी लग्न केले.

दरम्यान, लग्नानंतर अनुपम खेर यांनी किरण खेर यांच्या मुलालाही स्वीकारले आणि त्याला स्वत:चे नाव दिले. त्यामुळे सिंकदर आता सिंकदर खेर असे नाव लावतो.
