Anupam Kher pays Mahesh Bhatt: अनुपम खेर यांनी हिंदी सिनेमामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतींच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. बेबी, रॉय, आशिक, जोडी नंबर १, सरकार, कहो ना प्यार हैं अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या सारांश या चित्रपटातून अनुपम खेर यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यामुळे अनुपम खेर त्यांच्या प्रत्येक चित्रपटानंतर महेश भट्ट यांना एक रक्कम देतात. कारण- महेश भट्ट यांच्यामुळे त्यांच्या बॉलीवूडमधील प्रवासाला सुरुवात झाली होती.
“माझ्या प्रत्येक चित्रपटानंतर २५० रुपये…”
अनुपम खेर यांनी नुकताच पिंकविलाशी संवाद साधला. त्यांना या मुलाखतीत विचारले गेले की, तुमच्या ५५० चित्रपटांपैकी तुम्हाला जर कोणत्या सिनेमाचा रिमेक करायचा असेल, तर तो कोणता असेल? त्यावर अनुपम खेर म्हणाले, “एक अॅक्शन अॅक्टर म्हणून मला ‘सारांश २’मध्ये काम करायला आवडेल. एक महिन्यापूर्वी मी महेश भट्ट यांच्याशी बोललो आहे. मी स्वत:वर काम करत आहे. मला अॅक्शन चित्रपटात काम करायचे आहे, असे मी भट्टसाहेबांना सांगितले आहे.”
पुढे या मुलाखतीत महेश भट्ट यांच्याबद्दल अनुपम खेर म्हणाले, “त्यांनी मला चित्रपटात काम करण्याची पहिली संधी दिली होती. त्यामुळे मी त्यांना माझ्या प्रत्येक चित्रपटानंतर २५० रुपये द्यायचो. त्यानंतर ती रक्कम ५०० रुपये झाली, त्यानंतर १००० रुपये झाली. त्यानंतर ५००० आणि आता २५ हजार इतकी आहे. मी त्यांना आता प्रत्येक चित्रपटानंतर २५ हजार रुपये देतो. महागाईमुळे ही रक्कम वाढली असल्याचे ते म्हणतात. गेल्याच आठवड्यात मी त्यांना पैशांचे पाकीट दिले. आता ते फक्त पाकीट घेतात, ते उघडून बघत नाहीत. कारण- त्यांना माहीत असतं की, त्यामध्ये किती रक्कम आहे. पण, मला हे करायला आवडतं. माझ्यासाठी आता ही परंपरा बनली आहे.”
अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना शाप दिलेला
अनुपम खेर यांनी याआधी दिलेल्या एका मुलाखतीत एक आठवण सांगितली होती. महेश भट्ट यांनी अनुपम खेर यांच्याऐवजी सारांश या चित्रपटात संजीव कुमार यांना घेण्याचे ठरवले होते. त्यावेळी संतापून अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना शाप दिला होता.
एनएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, मी या भूमिकेसाठी अनेक महिन्यांपासून तयारी करत होतो; पण शूटिंगच्या काही दिवस आधीच मला कळलं की, त्यांच्या जागी संजीव कुमार यांना घेतलं जाणार आहे. जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी खचलो होतो. मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला; पण त्याआधी मी महेश भट्ट यांची भेट घेतली.
त्यांनी पुढे सांगितले होते, “मी त्यांच्या घरी गेलो. त्यांना म्हणालो की, तुम्हाला ती टॅक्सी दिसत आहे का? त्यामध्ये माझं साहित्य आहे. मी हे शहर सोडून जात आहे. पण, जाण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की, तुम्ही पृथ्वीवरील सर्वांत मोठी फ्रॉड व्यक्ती आहात. तुम्ही सर्वांत मोठे खोटारडे आहात. तुम्ही सत्यावर आधारित आशय असलेला चित्रपट बनवत आहात. पण, तुमच्यामध्ये ते सत्य नाही. सहा महिने तुम्ही मला सराव करायला सांगितले आणि आता तुम्ही मला चित्रपटातून अशा पद्धतीनं बाहेर काढत आहात. त्यानंतर मी त्यांना म्हणालो की, मी ब्राह्मण आहे आणि मी तुम्हाला शाप देतो. त्यानंतर महेश भट्ट यांनी निर्मात्याला फोन केला आणि सांगितलं की, आता जो यानं सीन केला, तो सीन फक्त हाच करू शकतो”, अशा प्रकारे त्यांना पहिली भूमिका मिळाली आणि त्याची आठवण अनुपम खेर यांनी सांगितली होती.
