Anupam Kher On Mr India : ‘मिस्टर इंडिया’ हा १९८७ मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. त्यात अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं आणि आजही या चित्रपटातील डायलॉग्ज ते गाण्यांपर्यंत सगळं काही लोकांच्या लक्षात आहे. त्यात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हेसुद्धा असणार होते. मात्र, अनिल कपूर यांनी त्यांना या सिनेमातून काढलं, असं स्वत: अनुपम यांनी सांगितलं आहे.

अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करीत असतात. अशातच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात त्यांनी ‘मिस्टर इंडिया’बद्दलचा हा किस्सा शेअर केला. अनुपम खेर यांनी सावत्र मुलगा सिकंदर खेरबरोबर मजा-मस्ती करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये दोघेही अनेक विषयांवर बोलतात. याच वेळी अनुपम खेर यांनी त्यांना ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातून काढून टाकल्याचा एक रंजक किस्सा सांगितला. त्यांनी म्हटलं की, सुरुवातीला या चित्रपटात ‘मोगॅम्बो’ची भूमिका त्यांना देण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना या चित्रपटातून बाहेर काढण्यात आले आणि ही भूमिका अमरीश पुरी यांना देण्यात आली.

Award Banner

त्यांनी म्हटले की, आपल्याला चित्रपटातून काढल्याची माहिती शेवटपर्यंत देण्यात आलीच नाही. ते म्हणाले, “मला ‘मिस्टर इंडिया’मधून काढण्यात आले होते. हे जावेदसाहेबांनी नाही, तर माझे जिवलग मित्र अनिल कपूर आणि बोनी कपूर यांनी केलं होतं. त्यांनी मला सिनेमातून काढून टाकण्याचं कारण शेवटपर्यंत सांगितलं नाही.” मात्र शेवटी अनुपम खेर यांनी हेही मान्य केले की, ‘मोगॅम्बो’ची भूमिका अमरीश पुरी यांनी जितक्या जबरदस्त पद्धतीनं साकारली, तशी दुसरा कोणीही करू शकला नसता.

याआधी एका मुलाखतीत अनुपम यांनी हीच आठवण सांगितली होती. तेव्हा ते म्हणालेले की, मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी अमरीश पुरी यांना घेतलं, तेव्हा मला त्यांच्याविषयी मत्सर वाटला होता. तसेच मला स्वत:बाबत कमीपणा आणि वाईट वाटलं. मला का काढलं गेलं, हा प्रश्न तेव्हा माझ्या मनात आला होता. त्या काळात मी स्वत:ला खूप कमी आणि दुर्लक्षित समजलं होतं. माझ्या डोक्यात सतत ‘तो रोल त्याला कसा काय मिळाला?’ हेच येत होतं.”

त्यानंतर अभिनेते म्हणाले, “एक-दोन महिन्यांनी निर्मात्यांनी मला काढून अमरीश पुरी यांना घेतलं. चित्रपटातून काढून टाकल्यानंतर वाईट वाटणं साहजिक आहे; पण जेव्हा मी ‘मिस्टर इंडिया’ पाहिला आणि त्यातील अमरीशजी पुरी यांचं काम पाहिलं, तेव्हा मला वाटलं की, निर्मात्यांनी योग्य निर्णय घेतला.”