गेल्या काही महिन्यात काही अशा घटना समोर आल्या आहेत, ज्यातून पती, पत्नी आणि वो हा ट्रँगल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत विवाहबाह्य संबंधातून पत्नीनेच पतीचा काटा काढला असल्याचे अनेक वृत्त समोर आले आहेत. ऐवढेच नाही तर हत्या लपवण्यासाठी प्रियकराच्या मदतीने मास्टर प्लॅनही आखल्याचं पाहायला मिळालं आहे. या पिढीतील प्रेमाची व्याख्याच पूर्णपणे बदलली आहे.
पत्नीकडून पतीची हत्या झाल्याच्या घटनांबद्दल नुकतीच गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली होती. अशातच बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनीसुद्धा आजच्या पिढीच्या प्रेम आणि बदलत्या नात्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्या ते त्यांच्या आगामी ‘तन्वी – द ग्रेट’ या चित्रपटाच्या प्रदर्शनात व्यग्र आहेत. या चित्रपटच्या निमित्ताने अनुपम खेर अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत.
अशातच इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अनुम खेर यांनी बदललेल्या नातेसंबंधांबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, “जगात सर्वत्र विचित्र आणि विकृत प्रवृत्ती असलेले लोक आहेत. ही फक्त भारतातलीच समस्या नाही. अनेक विकसित आणि प्रगत देशांमध्येही हे घडतं. त्यामुळे बदललेले नातेसंबंध ही केवळ भारतापूर्ती समस्या राहिलेली नाही ते सर्वत्र आहे.”
अनुपम खेर इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे ते म्हणाले, “तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, हल्ली काही बायका त्यांच्या नवऱ्यासाठी घातक ठरत आहेत. नवऱ्याच्या विरोधात जाऊन त्यांच्या नकळत ते प्लॅनिंग करतात आणि ही खूप भयंकर गोष्ट आहे. त्यामुळे मला वाटतं की, आता काही गोष्टी खूप वेगाने बदलत आहेत आणि त्या गोष्टी समजून घेणं कधीकधी खूप कठीण जातं.”
दरम्यान, अनुपम खेर यांच्या ‘तन्वी – द ग्रेट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून या चित्रपटाची कथा हा चित्रपट ‘स्पेशल चाईल्ड’वर आधारित असल्याचा अंदाज येत आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर एक उत्तम कथा आणि एक चांगला विषय असलेला चित्रपट असल्याचं म्हणत अनेकांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. येत्या १८ जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.