Anurag Kashyap confirms Relationship with Shubhra Shetty: बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या १० वर्षांपासून शुभ्रा शेट्टीबरोबर नात्यात असल्याची कबुली अनुराग कश्यपने दिली आहे. शुभ्रा व अनुराग यांनी जेनिस सिक्वेराला एकत्र मुलाखत दिली. “शुभ्राचा लग्नावर अजिबात विश्वास नाही,” असा खुलासा करत त्याने वयाच्या फरकामुळे मनात येणाऱ्या असुरक्षिततेवरही भाष्य केले. शुभ्राच्या आई आपल्यापेक्षा अवघ्या ७-८ वर्षांनी मोठ्या असून त्यांच्याशी उत्तम मैत्री असल्याचं अनुराग गमतीत म्हणाला.

मी तिच्याबरोबर खूप खूश आहे – अनुराग कश्यप

तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या प्लॅनबद्दल विचारलं असता अनुराग शुभ्राकडे इशारा करत म्हणाला, “तिचा लग्नावर विश्वास नाही.” पुन्हा लग्न करायला आवडेल का? असं विचारल्यावर तो म्हणाला, “मी तिच्याबरोबर खूप खूश आहे आणि मला तिच्याबरोबर राहायचंय. त्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेन. वयानुसार माणूस असुरक्षित होतो. माझं ज्यांच्यावर प्रेम आहे, त्यांच्यापेक्षा मला जास्त जगायचंय, जेणेकरून मला त्यांची काळजी घेता येईल. मला हे नातं गमावायचं नाही.”

भावुक झाला अनुराग कश्यप

शुभ्राने त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांतील एक आठवण सांगितली. शुभ्रा म्हणाली, “एकदा मी सहज म्हटलं होतं की, ‘प्रेमात पडणं ही एकमेव गोष्ट माझ्या बकेट लिस्टमध्ये होती. आता मी प्रेमात पडलेय, त्यामुळे मी आनंदाने मरू शकते.’ हे ऐकून अनुरागच्या डोळ्यांत पाणी आलं. तो म्हणाला, ‘याआधी गाडीचा अपघात झाला तरी मला फरक पडत नव्हता. पण आयुष्यात पहिल्यांदाच मला असं काहीतरी मिळालंय, ज्यासाठी मला जगावं वाटतंय. त्यामुळे आता मला मरायचं नाही.’ हे ऐकून मला भरून आलं होतं.” मुलाखतीत ही आठवण सांगताना अनुराग पुन्हा भावुक झाला.

Anurag Kashyap and Shubhra Shetty Dating Age Gap Marriage Plans Interview
अनुराग कश्यप व शुभ्रा शेट्टी (फोटो- इन्स्टाग्राम)

मी तिला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होतो- अनुराग कश्यप

दोघांनी त्यांच्यातील वयाच्या फरकावर सांगितलं. शुभ्रा सध्या तिशीत आहे, तर अनुराग ५३ वर्षांचा आहे. अनुराग म्हणाला, “एक वेळ अशी आली होती जेव्हा मी खूप कॉन्शिअस झालो होतो. शुभ्राच्या चेहऱ्यावरून तिचं वय अजिबात कळत नाही, ती अजूनही तशीच दिसते. मी म्हातारा होतोय, पण ती मात्र तशीच दिसते, हा विचार करून मी घाबरलो आणि तिला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागलो.”

शुभ्रा म्हणाली, “अनुरागने आयुष्यात खूप गोष्टी पाहिल्या आहेत, त्याला प्रेमाचा अर्थ माहीत आहे. पण मी माझ्या विशीत होते, तेव्हा माणूस स्वतःला ओळखत असतो. त्यामुळे त्याने मला बाहेर पडायला आणि त्याच्याकडे परतण्याचं कारण शोधायला सांगितलं होतं.” वयाच्या फरकाबद्दल अनुराग गमतीत म्हणाला, “शुभ्रा आणि तिचे कुटुंबीय सुरुवातीपासूनच या बाबतीत निवांत आहेत. तिच्या आई माझ्यापेक्षा फक्त ७-८ वर्षांनी मोठ्या आहेत आणि आमच्यात चांगली मैत्री आहे.”

कोण आहे शुभ्रा शेट्टी?

शुभ्राने अनुरागच्या ‘फँटम फिल्म्स’ या प्रॉडक्शन कंपनीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. दोघे गेल्या १० वर्षांपासून एकत्र आहेत.

अनुराग कश्यपचे आधीचे दोन घटस्फोट

अनुरागचं पहिलं लग्न चित्रपट एडिटर आरती बजाजशी झालं होतं. २००९ मध्ये ६ वर्षांच्या संसारानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना आलिया कश्यप नावाची मुलगी आहे, तिचंही लग्न झालं आहे. यानंतर अनुरागने अभिनेत्री कल्की कोचलिनशी २०११ मध्ये लग्न केलं. चार वर्षांच्या संसारानंतर त्यांचाही घटस्फोट झाला. कल्कीने नंतर दुसरं लग्न केलं आणि तिला एक मुलगी आहे.