२५ जानेवारीला ‘पठाण’ प्रदर्शित झाला अन् बॉक्स ऑफिसवर त्याने इतिहास रचला. एक दोन नव्हे तर तब्बल २० रेकॉर्ड या चित्रपटाने तोडले इतकंच नव्हे तर भारतात या चित्रपटाने ३०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. ‘बॉयकॉट’ ट्रेंडमुळे चांगलाच चर्चेत असलेल्या ‘पठाण’च्या यशाने बरीच लोक आश्चर्यचकित झाली आहेत. मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांनीसुद्धा या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
नुकतंच दिग्दर्शक अनुराग कश्यप यानेसुद्धा या चित्रपटाबद्दल वक्तव्य देत बॉयकॉट गँग आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका केली आहे. अनुरागच्या मते भाजपाच्या राइट विंगकडून झालेला या चित्रपटाला विरोध हा या चित्रपटाचं काही एक वाकडं करू शकलेला नाही. इतकंच नाही दाक्षिणात्य चित्रपटांनी केलेली बॉलिवूडवर कुरघोडी आणि बॉलिवूडचं अंधकारमय भवितव्य याबद्दलही अनुरागने भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘पठाण’चे तिकीट दर होणार कमी; जाणून घ्या तिकीट दर कमी कसे होतात? याचा फायदा कोणाला होतो?
इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना अनुराग म्हणाला, “पठाणला मिळालेलं यश हे महत्त्वाचं आहेच, पण या यशाने ट्रोलर्सची तोंडं बंद केली आहेत. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईचे आकडे पाहता अजूनही काही लोक या चित्रपटाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना या ‘पठाण’ने नागवं केलं आहे.”
पुढे अनुराग म्हणाला, “हा चित्रपट पाहू नका यात चुकीची माहिती दिली आहे असं सांगणाऱ्या लोकांचं पितळ उघडं पडलं आहे. जी लोक हा अजेंडा रेटत आहेत ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य नागरिक नसून उजव्या विचारसरणीची टोळधाड आहे, परंतु लोकांनी त्यांच्या या सांगण्यावर विश्वास न ठेवता शाहरुख खानच्या चित्रपटावर प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला आहे ते आपल्याला तिकीटं आणि कमाईच्या आकड्यांवरून दिसतंच आहे.” अनुराग कश्यप सध्या त्याच्या ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डिजे मोहब्बत’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.