अनुराग कश्यपचा बहुप्रतिक्षित ‘केनेडी’ हा चित्रपट अखेर भारतात प्रदर्शित होत आहे. यामध्ये राहुल भट्ट आणि सनी लिओनी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २० फेब्रुवारीला ZEE5 या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. ‘केनेडी’ गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. अनुराग कश्यपने २०२३ मध्ये एका रात्रीत या चित्रपटाची कथा लिहिली होती. हा तो काळ होता जेव्हा त्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक अपयशांचा सामना करावा लागला होता. याची सुरुवात नेटफ्लिक्स इंडियाने त्याच्या ‘मॅक्सिमम सिटी’ या मोठ्या प्रोजेक्टचे काम थांबवल्यामुळे झाली होती, असा खुलासा त्याने केला आहे.
नेटफ्लिक्सचा ‘मॅक्सिमम सिटी’ प्रोजेक्ट आणि अनुरागचा संताप
अनुराग कश्यप एका मुलाखतीत म्हणाला, “मी फक्त ‘मॅक्सिमम सिटी’ हा प्रोजेक्ट बंद झाल्यामुळे दुःखी होतो. मी खूप हताश झालो होतो कारण त्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती, गुंतवणूक केली होती. मी २००९ पासून या प्रोजेक्टशी जोडलेला होतो. २००९ मध्ये ऑस्कर जिंकणाऱ्या ‘स्लमडॉग मिलियनेअर’चे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी सायमन ब्यूफॉयबरोबर आणखी एक भारतीय पुस्तक ‘मॅक्सिमम सिटी’ अडॅप्ट करायचं ठरवलं, पण हा प्रोजेक्ट पुढे सरकला नाही.”
अनुराग कश्यपने ‘द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्याने ‘शोटाइम’ची एक मोठी ऑफर नाकारली होती. त्या ऑफरमध्ये विक्रम चंद्रा यांच्या २००६ मधील ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीवर आधारित एक शो रिडली स्कॉट आणि वॉर्नर ब्रदर्स निर्मित करणार होते. तसेच, ‘फॉरेस्ट गंप’ फेम एरिक रोथ यांच्यासोबत ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स यांच्या ‘शांताराम’ या पुस्तकावर काम करण्याची ऑफरही त्याने नाकारली होती.
अनुराग म्हणाला, “त्यामध्ये भारताचे चित्रण पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले होते. भारतावर आधारित कोणतीही गोष्ट मी इंग्रजी भाषेत करणार नाही, या निर्णयावर मी ठाम होतो. म्हणूनच जेव्हा सुकेतु मेहता यांनी ‘मॅक्सिमम सिटी’ हिंदीत करण्यास सांगितलं, तेव्हा मला खूप आनंद झाला. मी ती कथा लिहण्यापूर्वीच नेटफ्लिक्सने या प्रोजेक्टला परवानगी दिली होती. मी त्यांना पुस्तक वाचायला सांगितले, पण ते फक्त एकाच व्यक्तीने वाचलं होते. मी त्यांना म्हटलं की होतं की ‘तुम्ही नेमकी कशाला परवानगी देत आहात हे आधी नीट समजून घ्या.’ तेव्हा त्यांनी नेटफ्लिक्ससाठी ‘सेक्रेड गेम्स’ला अडॅप्ट केलं होतं, जी २०१७ मध्ये त्यांची पहिली भारतीय ओरिजिनल सीरिज ठरली.”
नेटफ्लिक्सने थांबवायला हवं होतं, पण…
अनुराग कश्यपच्या स्क्रिप्टच्या पहिल्या १५ पानांमध्येच त्यांना काही अडचण होती, तर नेटफ्लिक्सने त्याला तिथेच थांबवायला हवं होतं; पण त्यांनी त्याला ९०० पानं लिहेपर्यंत थांबवलं नाही. “ते दीड वर्ष गप्प राहिले हे जास्त त्रासदायक होतं.” २०२१ मध्ये प्राइम व्हिडीओच्या ‘तांडव’ वादानंतर नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या ‘पॉलिसी’मध्ये बदल केले होते, परिणामी दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘तीस’सह अनेक शो आणि चित्रपट रद्द करण्यात आले.
अनुराग पुढे म्हणाला, “त्यानंतर नुकसान भरपाई म्हणून ते मला मिडियॉकर स्क्रिप्ट्स पाठवत होते. या साधारण स्क्रिप्ट्ससाठी मला अधिक वेळ हवा आहे, असं मी म्हटल्यावर ते म्हणाले, ‘नाही, पण आमच्याकडे चार महिन्यांनंतर कलाकारांच्या तारखा उपलब्ध आहेत.’ मी त्यांना स्पष्ट नकार दिला. मी काम करू शकतो, पण त्यासाठी मला पुरेसा वेळ द्यावा लागेल.”
अनुरागने खुलासा केला की, त्याने लिहिलेल्या एका शोचा ‘पायलट एपिसोड’ नेटफ्लिक्सला खूप आवडला होता. मात्र, नेटफ्लिक्सला तो शो प्रसिद्ध स्पॅनिश थ्रिलर ‘मनी हाइस्ट’चं (Money Heist) भारतीय व्हर्जन बनवायचं होतं. अनुरागने त्यासाठी नकार दिला. मग त्याने नेटफ्लिक्स इंडियाचं काम सोडलं आणि कित्येक महिने तो या धक्क्यातून सावरू शकला नाही.
हृदयविकाराचे झटके आले – अनुराग कश्यप
अनुराग म्हणाला, “तो अनुभव एखाद्या मिसकॅरेजसारखा होता. त्या मानसिक धक्क्यामुळे मला हृदयविकाराचे दोन झटके आले. मला रक्त पातळ होण्याची औषधं घ्यावी लागली. त्यानंतर लसीची रिॲक्शन झाली. मला दमा झाला आणि मी स्टिरॉइड्सवर होतो. या औषधांच्या परिणामांमुळे मी ड्रग्ज घेत असल्यासारखी माझ्या मेंदूची अवस्था झाली होती.”
२०२२ मध्ये ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना अनुराग म्हणालेला “मी तीन वेळा व्यसनमुक्ती केंद्रात गेलो होतो, मला हृदयविकाराचा झटका आला होता आणि माझी प्रकृती खालावली होती. हे सगळं कसं हाताळावं, हेच मला समजत नव्हतं. त्यानंतर हळूहळू मी पुन्हा सावरलो. आता मी स्वतःच्या पायावर उभा आहे. मी चित्रपट बनवणं सुरूच ठेवलं. इतर लोकांसारखं मी निवांत बसू शकत नव्हतो. कारण मी खूप मोठ्या बजेटचे चित्रपट करत नाही, ज्यामुळे माझी टीम मी सांभाळू शकेन.”
३५ किलो वजन वाढले आणि व्हीलचेअरवर जावे लागले
अनुराग कश्यपला फक्त डिप्रेशन आणि दमा यांसारख्या आरोग्य समस्याच नव्हत्या, तर तो खूप जास्त दारू पिऊ लागला आणि बाहेरचं खाऊ लागला. यामुळे अवघ्या आठ महिन्यांत त्याचे ३५ किलो वजन वाढले. “माझ्या मुलीला काळजी वाटत होती. तिने मला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं. तिथे क्रिकेट खेळताना माझ्या उजव्या पायाला दुखापत झाली. ब्लड थिनर्समुळे सर्जरी होऊ शकली नाही आणि बरेच महिने मी व्हीलचेअरवर होतो. मी बरेच महिने बेड रेस्टवर होतो,” असं अनुराग कश्यपने सांगितलं.
