Anurag Kashyap net worth: एखादा सिनेमा जेव्हा गाजतो, त्या वेळी सिनेमाची गोष्ट, कलाकारांचा अभिनय यांबरोबरच सिनेमाच्या दिग्दर्शकाचेही मोठे योगदान असते. अशाच प्रकारे बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शकांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलेले आहे.
बॉलीवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांमध्ये अनुराग कश्यपचेही नाव घेतले जाते. अनुराग कश्यप अनेकदा फक्त त्याच्या सिनेमांमुळेच नाही, तर त्याच्या वक्तव्यांमुळेदेखील मोठ्या प्रमाणात चर्चेत असतो. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. अनुराग कश्यपच्या संपत्तीची वेळोवेळी चर्चा होताना दिसते.
अनुराग कश्यपला करावा लागलेला संघर्ष
अनुराग कश्यपने दिग्दर्शक असण्याबरोबरच पटकथा लेखक आणि निर्माता म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याचा जन्म १० सप्टेंबर १९७२ रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाला. अनुराग कश्यप यांनी दिल्लीतील हंसराज कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.
चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी अनुराग १९९३ साली फक्त पाच हजार रुपये घेऊन मुंबईत आला. त्या काळात तो कामाच्या शोधात फिरत होता. मुंबईसारख्या नवीन शहरात राहून काम शोधून ते करणे अत्यंत कठीण गोष्ट असते. सुरुवातीच्या काळात अनुरागला रस्त्यावर झोपावे लागले.
अनुराग कश्यपने सीरियल किलर ऑटो शंकरच्या जीवनावर आधारित ‘ऑटो नारायण’ या चित्रपटाची कथा लिहिली. त्यानंतर त्याने हंसल मेहतांच्या ‘जयते’ या चित्रपटाची कथा लिहिली; मात्र हे दोन्ही चित्रपट कधी प्रदर्शित झाले नाहीत. मनोज बाजपेयींच्या १९९८ सालच्या ब्लॉकबस्टर ‘सत्या’ या चित्रपटाची कथा अनुराग कश्यपने लिहिली होती. त्यानंतर त्याने १९९९ सालच्या ‘शूल’ या चित्रपटाचे संवाद लिहिले.
अनुरागने १९९९ सालच्या ‘कौन’ या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. त्याने २०१० सालच्या ‘उडान’ आणि २०१८ सालच्या ‘भावेश जोशी सुपरहीरो’ या चित्रपटांची पटकथा लिहिली. तसेच त्याने २००५ सालच्या ‘वॉटर’ या चित्रपटासाठी हिंदी संवादही लिहिले होते. अनुरागने ‘पाँच’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले; मात्र हा चित्रपट कधी प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यानंतर त्याने ‘ब्लॅक फ्रायडे’ दिग्दर्शित केला.
मग त्याने ‘नो स्मोकिंग’, ‘मुंबई कटिंग’, ‘देव. डी’, ‘गुलाल’ व ‘द गर्ल इन यलो बूट्स’ यांसारखे चित्रपट बनवले. ‘देव. डी’ व ‘गुलाल’ यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्याला २०१२ सालच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाने मोठी ओळख मिळवून दिली.
‘गँग्स ऑफ वासेपूर’नंतर अनुरागने ‘मनमर्जियाँ’, ‘चोक्ड’, ‘दोबारा’, ‘ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘रमन राघव २.०’ व ‘मुक्काबाज’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तसेच त्याने ‘मसान’, ‘द लंचबॉक्स’, ‘क्वीन’ व ‘उडता पंजाब’ यांसारख्या चित्रपटांसाठी निर्माता म्हणूनही काम केले.
एकेकाळी त्याला रस्त्यावर झोपून दिवस काढावे लागले. मात्र, सध्या तो कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. डीएनएच्या एका रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ८५० कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग कश्यप दर महिन्याला सहा कोटी रुपये कमावतो. त्याचे ‘अनुराग कश्यप फिल्म्स’ हे प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे.
