‘बॉम्बे व्हेलवेट’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा त्या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. अनुराग कश्यपने या चित्रपटाची निर्मीत केली होती. या चित्रपटाला एका मोठ्या स्टुडिओचा पाठिंबा मिळाला होता. तसेच रणबीर कपूर व अनुष्का शर्मा हे कलाकार यात होते. पण तरीही ‘बॉम्बे व्हेलवेट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला. त्यानंतर अनुरागने पुन्हा कधीही मोठ्या कलाकारांबरोबर चित्रपट न बनवण्याची शपथ घेतली. ‘बॉम्बे व्हेलवेट’ सिनेमामुळे अनुराग कश्यपचे रणबीर कपूरबरोबरचे संबंधही ताणले गेले.

स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यपने सांगितलं की जेव्हा जेव्हा हा चित्रपट माध्यमांमध्ये चर्चेत येतो, तेव्हा रणबीरला राग येतो. “मला वाटतं की रणबीर खूप नाराज झाला आणि तो नेहमी म्हणतो, ‘तुम्ही ‘बॉम्बे व्हेलवेट’बद्दल का बोलत असता? त्याकडे दुर्लक्ष करा. चित्रपट चालला नाही, पण तुम्ही त्याबद्दल सतत बोलण्याची गरज नाही.’ पण लोक मला नेहमी या सिनेमाबद्दल प्रश्न विचारतात, मी त्याकडे दुर्लक्ष कसं करायचं?” असा सवाल अनुराग कश्यपने केला.

चित्रपट फ्लॉप झाल्यावर सहकलाकारांना सामोरं जाताना आलेल्या अडचणी अनुरागने सांगितल्या. “आता आम्ही वारंवार भेटत नाही. जेव्हाही भेटतो, तेव्हा फक्त एकमेकांना मिठी मारतो तेवढंच. खरं तर सुरुवातीला, त्यांना कसं सामोरं जावं हेच मला कळत नव्हतं, कारण त्यांनी माझ्यावर खूप विश्वास आणि प्रेम दाखवलं होतं. मी तेव्हा माझ्या आयुष्यातील समस्यांना सामोरा जात होतो, त्यामुळे मला त्यातून बाहेर पडण्याची आणि एक छोटा चित्रपट बनवण्याची गरज होती. मी ‘रमन राघव’वर खूप लक्ष केंद्रित केलं होतं. पण हळूहळू आमच्यातील अंतर वाढलं, असं मला वाटतं,” असं अनुराग कश्यपने नमूद केलं.

Award Banner

सर्वात हास्यास्पद कारण – अनुराग कश्यप

चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर स्टुडिओच्या रिसर्च टीमने त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील काही विचित्र निष्कर्षांपैकी एक अनुरागने सांगितला. “चित्रपट इतका मोठा फ्लॉप झाल्यावर त्यांनी कारणं शोधली. तेव्हा धक्कादायक गोष्ट अशी समोर आली की, लोकांना रणबीरचे केस आवडले नाहीत. त्यांनी म्हटलं की प्रेक्षक रणबीरच्या केसांमुळे नाराज झाले, कारण त्यात त्याचे केस कुरळे होते. आणि तो निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला होता, आम्ही तशीच हेअरस्टाईल डिझाइन केली. आणि जेव्हा मी हे ऐकलं, तेव्हा मला वाटलं की, हे सर्वात हास्यास्पद कारण आहे. कोणी म्हणेल की, ‘अरे, मला चित्रपट आवडला नाही,’ तर ठिक आहे. पण केस आवडले नाहीत म्हणून चित्रपटाला ओपनिंग मिळाली नाही आणि लोक चित्रपट पाहायला गेले नाहीत, हे हास्यास्पद होतं,” असं अनुराग कश्यप म्हणाला.

रणवीर सिंहसाठी लिहिलेला चित्रपट

‘बॉम्बे व्हेलवेट’ चित्रपट रणवीर सिंहला डोळ्यासमोर ठेवून तयार केला होता. पण चित्रपटाच्या निर्मितीसाठी पाठिंबा देणाऱ्या स्टुडिओने रणबीर कपूरला घेण्याचा आग्रह धरला. “सुरुवातीला या चित्रपटाचं बजेट जास्त नव्हतं. पण नंतर त्याचं बजेट खूप वाढलं. ते स्वीकारायला, तसेच अभिनेत्याच्या बदलाला सामोरं जायला मला वेळ लागला. मी हा सिनेमा रणवीर सिंहसाठी लिहिला होता, पण त्यावेळी तो खूप नवीन होता. पण सर्वांनी रणबीरच्या नावावरच तो विकला, हे सर्व स्वीकारायला मला किमान एक वर्ष लागलं,” असं अनुराग कश्यपने सांगितलं.