Anurag Kashyap Shubhra Shetty Relationship Age Gap: लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप हा १० वर्षांपासून शुभ्रा शेट्टीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं आपल्या प्रेमाची कबुली दिली असून, त्या दोघांमध्ये जवळपास २० वर्षांचं अंतर आहे. नुकतीच त्यांनी जेनिस सिक्वेराला एकत्र दिलेल्या मुलाखतीमध्ये एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त केलं. दोघांमधील वयाच्या अंतरावरून शुभ्राच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दलची माहिती तिनं दिली आहे.

शुभ्राला तिचे अनुराग कश्यपबरोबर असलेले रिलेशनशिप जाहीर करायचे नव्हते. ती म्हणाली, “मी तिशीच्या वयामध्ये असून, आम्हाला आमच्या नात्याबद्दल सर्वांना सांगायचं नव्हतं आणि म्हणून मी ते लपवण्याचा प्रयत्न करीत होते. आम्ही लोकांबरोबर कार्यक्रम आणि पार्ट्यांना जायचो; पण फक्त मला मीडियापासून दूर राहायचं होतं.”

अनुराग कश्यप व शुभ्रा यांचं रिलेशनशिप कोणामुळे आलं उघड?

पुढे शुभ्रा म्हणाली, “मीडियातील एक व्यक्ती काहीतरी बातमी मिळावी यासाठी आली होती आणि त्याला खरंच ती मिळाली. पण, ज्या व्यक्तीचा शोध बातमीसाठी घेतला जात होता, तिलाच बातमी बनायचं नव्हतं; पण मीडियातील त्या व्यक्तीमुळे आमचं नातं सर्वांसमोर उघड झालं.”

अनुराग कश्यप हा तिच्यापेक्षा २० वर्षांनी मोठा असल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल शुभ्राच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया काय होती, याबाबतही तिला विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, “माझी आई त्याला ‘बकरा’ म्हणते. कारण- माझ्या आईला वाटतं की, तो माझ्याबरोबर राहतोय म्हणजेच तो नक्कीच जरा वेडा आहे. तो बायकोचं ऐकणारा नवरा असल्याचं माझ्या आईला वाटतं. माझ्या आई-वडिलांनी आम्हाला समजून घेतलं. मला त्यांची समजूत घालावी लागली नाही.”

अनुराग कश्यप व शुभ्रा यांची भेट कधी झाली, याबद्दलही तिनं सांगितलं. शुभ्रा म्हणाली, ” ‘बॉम्बे वेल्वेट’चं शूटिंग पूर्ण झालं होतं; पण सिनेमा प्रदर्शित झाला नव्हता. त्या मधल्या काळात अनुरागच्या आयुष्यात खूप चांगला वेळ सुरू होता. तो खूप फिट, आनंदी होता, पुस्तकं वाचत होता आणि चित्रपट पाहत होता. त्यामुळे त्याच्या या सगळ्या आवडींमुळे आमच्यात जवळीक निर्माण झाली. तो नेहमी म्हणतो, ‘जर मी त्याला काही वर्षांपूर्वी भेटले असते, तर मी त्याला डेट केलं नसतं.’ पण, मला असं वाटत नाही. मी त्याच्या आयुष्यातील त्या एका छोट्याशा ‘गोल्डन विंडो’मध्ये मी त्याला भेटले, जेव्हा त्याची खूप चांगली वेळ सुरू होती.”

दरम्यान, अनुराग कश्यपचे यापूर्वी दोन घटस्फोट झाले आहेत. त्यानं पहिल्यांदा आरती बजाजबरोबर लग्न केलं होतं; पण २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना आलिया कश्यप नावाची मुलगी आहे. त्यानंतर त्यानं २०११ मध्ये अभिनेत्री कल्की कोचलिनबरोबर दुसरं लग्न केलं होतं; पण त्यांचं नातंही जास्त काळ टिकलं नाही. त्यांचा चार वर्षांनंतर घटस्फोट झाला.