IFFI 2023 : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. कधी ‘मोहिनी’ तर कधी ‘चंद्रमुखी’च्या भूमिकेत माधुरी दीक्षितने प्रत्येक वेळी तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिच्या भूमिकांना अजरामर केलं. तुलनीय सौंदर्यासोबतच माधुरी दीक्षित एक अप्रतिम नृत्यांगनादेखील आहे. माधुरीची जबरदस्त क्रेझ आजच्या तरुण पिढीतही पाहायला मिळते. याच माधुरीला आज ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एका महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
केंद्रीय सूचना व माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबद्दल घोषणा केली आहे. ‘५४ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ (IFFI) मध्ये माधुरी दीक्षितला भारतीय चित्रपटविश्वात अद्भुत आणि अविस्मरणीय असं योगदान दिल्याबद्दल विशेष पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा अनुराग यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून केली. अत्यंत खास शब्दांत अनुराग यांनी माधुरीचं कौतुक केलं आहे.




आणखी वाचा : ‘डंकी’चा शेवट कसा असेल? जावेद अख्तरांचा किंग खानच्या चित्रपटाच्या क्लायमॅक्सबद्दल मोठा खुलासा
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ते लिहितात, “माधुरी दीक्षितने ४ दशकं आपल्या प्रतिभेने आणि अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘निशा’ पासून ते मनमोहक ‘चंद्रमुखी’ पर्यंत, ‘बेगम पारा’पासून ‘रज्जो’ पर्यंत, तिच्या अभिनयातील विवधतेला काहीच मर्यादा नाहीत. आज आम्हाला ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अशा प्रतिभावान अभिनेत्रीला ‘भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष सन्मान’ पुरस्कार प्रदान करताना फार आनंद होत आहे.”
गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली असून बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजनी तिथ हजेरी लावली आहे. गेल्यावर्षीचा हा पुरस्कार सोहळा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’या वादग्रस्त चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला होता. यंदा या महोत्सवात नेमक्या कोणत्या चित्रपटांना पुरस्कार मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.