आई होण्याचा किंवा आई न होण्याचा निर्णय घेणं यावरुन हल्ली अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. काही अभिनेत्री ठरवून आई न होण्याचा निर्णय घेतात तर काहींना आई व्हायचं असतं मात्र नैसर्गिकरित्या त्यांच्यासाठी ते शक्य नसतं. त्यामुळे हल्ली विज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक जोडपी पालकत्वाचा प्रवास सुरू करू शकत आहेत. परंतु, हा प्रवाससुद्धा काही सोपा नसतो. नकतंच एका लोकप्रिय अभिनेत्रीनेसुद्धा तिच्या आई होण्याच्या प्रवासाबद्दलचा अनुभव आणि त्या दरम्यान सोसावा लागणारा त्रास याबद्दल सांगितलं आहे.
हिंदी इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अभिनेत्री अनुष्का रंजन या अनुभवातून जात आहे. यावेळी तिने हा प्रवास तिच्यासाठी खूपच वेदनादायी असल्याचं म्हटलं आहे. नुकत्याच एका व्लॉगमध्ये अनुष्काने खुलासा केला की, IVF प्रक्रियेदरम्यान तिला तब्बल १५० इंजेक्शन्स घ्यावी लागली आहेत. या उपचारामुळे तिला खूप त्रास आणि वेदना सहन कराव्या लागत असल्याचेही तिने म्हटलं. तरीही आई होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती हा कठीण प्रवास सकारात्मकतेने पार करत असल्याचं म्हटलं.
अनुष्काने सांगितला तिचा वेदनादायी प्रवास
अनुष्काने सांगितलं की २०२३-२४ दरम्यान तिने आणि तिचा नवरा अभिनेता आदित्य सीलने पालकत्वाबद्दल विचार केला होता. ती म्हणाली, “मी आणि आदित्य कुटुंब वाढवण्याबद्दल विचार करू लागलो होतो. २०२३ आणि २०२४ मध्ये आम्ही याकडे फार सहजतेने पाहत होतो. आम्ही दोघेही काम आणि प्रवासात खूप व्यग्र होतो, त्यामुळे याबाबत नंतर विचार करू असं आम्हाला वाटत होतं.”
यावेळी तिने प्रेग्नन्सीबद्दल असलेल्या गैरसमजांवरही भाष्य केलं. ती म्हणाली, “लहानपणापासून आपल्याला असं शिकवलं जातं की, तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर शारीरिकदृष्ट्या जवळ आलात तर तुम्हाला दिवस जाऊ शकतात वगैरे, पण प्रत्यक्षात ते तितकं सोपं नसतं. हे पूर्णपणे खरं नाही.”
अनुष्काने या अनुभवातून जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचंही अधोरेखित केलं. अनुष्का रंजनने पुढे सांगितलं की, नैसर्गिक पद्धतीने आई होण्यासाठी अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे सुरुवातीला सर्व काही सोपं वाटत होतं. वैद्यकीय तपासण्यांमध्येही डॉक्टरांना कोणतीही मोठी समस्या आढळली नव्हती. मात्र, सर्व तपासण्या सामान्य असूनही वारंवार प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नव्हते. त्यामुळे गर्भधारणेचा प्रवास तिच्यासाठी अधिक आव्हानात्मक ठरत गेला. यानंतर डॉक्टरांनी अनुष्काला IVF उपचाराचा पर्याय स्वीकारण्याचा सल्ला दिला. मात्र हे ऐकून सुरुवातीला तिला धक्का बसला होता.
याबद्दल बोलताना ती म्हणाली, “जेव्हा डॉक्टरांनी पुढचा टप्पा IVF असेल असं सांगितलं, तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला, अरे देवा याचा अर्थ माझ्यात काही कमतरता आहे का? आमच्यात काही समस्या आहे का? पण हा गैरसमज दूर करायचा आहे. तसं अजिबात नाही. IVF करावं लागतंय याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये काही दोष आहे, असा होत नाही. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं, प्रत्येकाचं आयुष्य आणि प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाचा अनुभवही वेगळा असतो.” अनुष्काने IVF उपचारांबाबत समाजात असलेल्या गैरसमजांवर भाष्य करत, या प्रक्रियेकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचं आवाहन केलं. तिच्या मते, IVF हा कमतरतेचा नाही तर पालक होण्याच्या प्रवासातील एक वैद्यकीय पर्याय आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली, “IVFच्या माध्यमातून आई होण्याचा प्रवास अत्यंत कठीण असतो. या प्रक्रियेत शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही आव्हानांना सामोरं जावं लागतं. जर कोणी तुम्हाला IVF हा सोपा मार्ग आहे असं सांगत असेल, तर मला ते मान्य नाही. या प्रक्रियेत घ्यावी लागणारी इंजेक्शन्स, औषधे आणि इतर उपचार अजिबात सोपे नसतात.”
अनुष्काला घ्यावी लागली १५० इंजेक्शन
अनुष्काने पुढे महिलांच्या ताकदीबद्दल बोलताना सांगितलं की, “खरं सांगायचं तर या संपूर्ण प्रक्रियेतून मला एकच गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे महिला खूपच खंबीर आणि मजबूत असतात.” यावेळी तिने IVF उपचारांदरम्यान अनुभवलेल्या वेदनादायक प्रसंगाचाही खुलासा केला. अनुष्काने सांगितले की, या संपूर्ण प्रक्रियेत तिला जवळपास १५० इंजेक्शन्स घ्यावी लागली आहेत. ती म्हणाली, “मला वाटतं मी आतापर्यंत जवळपास १५० इंजेक्शन्स घेतली आहेत. त्यापैकी एक इंजेक्शन खूप घट्ट आणि तेलकट स्वरूपाचं असायचं. ते इंजेक्शन घेताना मला खूप वेदना व्हायच्या. प्रत्येक वेळी ते इंजेक्शन दिलं की माझ्या डोळ्यांत पाणी यायचं आणि मी वेदनेने रडायचे.” IVFच्या प्रवासात शारीरिक वेदनांबरोबरच भावनिक चढ-उतारांनाही सामोरं जावं लागतं, याकडेही अनुष्काने लक्ष वेधलं. तिच्या या अनुभवामुळे अनेक महिलांना आपल्या संघर्षांबद्दल मोकळेपणाने बोलण्याची प्रेरणा मिळत आहे.
अनुष्काच्या मते, IVF उपचारांदरम्यान भावनिक ताणही खूप असतो. काही वेळा कुटुंबीयांकडून किंवा समाजाकडून दबावही जाणवू शकतो. मात्र याबाबतीत तिने तिच्या कुटुंबाचे विशेष आभार मानले. ती म्हणाली, “माझ्या कुटुंबातील कोणीही मला कधीही हे असं का होतंय? किंवा काय समस्या आहे? असं वाटू दिलं नाही. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मला साथ दिली.” या कठीण प्रवासात कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच स्वतःला बळ मिळाल्याचंही अनुष्काने सांगितले.
दरम्यान, ३५ वर्षीय अनुष्काने २०२१ मध्ये अभिनेता आदित्य सीलबरोबर लग्न केलं होतं. अनुष्काने ‘वेडिंग पुलाव’ आणि ‘बत्ती गुल मिटर चालू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर ३८ वर्षीय आदित्य सीलने ‘एक छोटीसी लव्ह स्टोरी’, ‘तुम बिन २’, ‘खेल खेल में’, आणि ‘इंदु की जवानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. लग्नानंतर आता हे दोघेही त्यांच्या आयुष्यातील नव्या टप्प्याची सुरुवात करत असून, IVFच्या मदतीने ते लवकरच आई-वडील होणार आहेत.
