विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. विरुष्काचं प्रेम, त्यांची केमिस्ट्री याची नेहमीच सर्वत्र चर्चा होत असते. मात्र, या जोडप्याने आपला फिटनेस देखील उत्तमप्रकारे जपला आहे. विराट-अनुष्का दोघंही ‘फिटनेस फ्रीक’ आहेत. अनुष्काने वामिका व अकायच्या जन्मानंतर आपल्या दैनंदिन जीवनात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. याबद्दल अभिनेत्रीने मसाबा गुप्ताला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता.

अनुष्का सांगते, “सुरुवातीला वामिका आणि मी… आम्ही दोघी रात्री लवकर झोपायचो आणि आता सगळे आम्हा दोघींना फॉलो करतात.” अनुष्का शाकाहारी असल्याने तिच्या आहारात प्रामुख्याने फळं आणि भाज्यांचा समावेश असतो.

अभिनेत्रीच्या दिवसाची सुरुवात टोस्ट किंवा ताजी फळं खाऊन होते. यानंतर दुपारच्या जेवणाआधी ती लिंबूपाणी किंवा नारळपाणी पिते. अनुष्काच्या दुपारच्या जेवणात चपाती, डाळ, भाजी, सॅलड अशा घरगुती पारंपरिक पदार्थांचा समावेश असतो. अभिनेत्रीच्या जेवणात फॅन्सी पदार्थ नसतात… ती बाहेरचे किंवा शिळे पदार्थ खात नाही.

यानंतर अनुष्का संध्याकाळच्या नाश्ताला सिझनल फळं खाते. तिच्या रात्रीच्या जेवणात सॅलड, एक वाटी सूप आणि भाताच्या पदार्थांचा समावेश असतो.

अनुष्का शर्मा तिच्या दिनचर्येबद्दल सांगताना म्हणाली होती, “दररोज पहाटे साडेपाच ते सहा वाजता माझा दिवस सुरु होतो, दुपारचं जेवण ११ वाजता आणि मी माझं रात्रीचं जेवण संध्याकाळी ५.३० वाजता जेवते. त्यानंतर घरी एकटी असल्याने मला प्रश्न पडायचा आता काय करायचं… तर, त्यापेक्षा रात्री लवकर झोपूया अशी सवय मी स्वत:ला लावून घेतली. हळुहळू मला या दिनचर्येची सवय झाली आणि याचे फायदेही दिसू लागले. मला चांगली झोप लागायची. सकाळ झाल्यावर फ्रेश वाटायचं… डोक्यावरचा ताण हलका व्हायचा. मी याबद्दल कुठेच वाचलं नव्हतं. याची सवय मला वामिकामुळे झाली आणि आता मी अशीच दिनचर्या फॉलो करते.”

अनुष्का ब्रूट इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगते, “गरोदर असल्यावर स्त्रियांना विविध पदार्थ खाण्याचे डोहाळे लागतात. पण, खरं सांगायचं झालं तर माझ्या बाबतीत तसं झालं नाही. मला फक्त मनापासून वडापाव खावा असं खूप वाटायचं. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आपण खाल्ली पाहिजे असं जाणवतं. तेव्हा तुम्ही कसलाही विचार न करता तो पदार्थ खाल्ला पाहिजे. फक्त प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण हवं, त्याचा अतिरेक चांगला नाही. मला छोले भटुरे खायची इच्छा झाली तर मी नक्कीच खाईन. मला वडापाव, भजी खाल्ली पाहिजे असं वाटलं…तर मी ते सुद्धा खाईन. फक्त या गोष्टी आपण प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत. मी सलग काही आठवडे किंवा सलग काही महिने एकच पदार्थ खाऊ शकते. एकदा सलग महिनाभर मी रात्रीच्या जेवणात खिचडी आणि वांग्याचं भरीत खाल्लं होतं. याशिवाय सकाळी ब्रेकफास्टला सलग सहा महिने मी इडली सांबर खायचे. आपल्या आवडीचे पदार्थ खाल्ल्याने आपलं मानसिक आरोग्य देखील व्यवस्थित राहतं.” याशिवाय अभिनेत्री दिवसभरात ३-४ लिटर पाणी पिते.

अनुष्का Vegan असल्याने तिच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश अजिबातच नसतो. ग्लूटेन, साखर, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ती खात नाही. याऐवजी अभिनेत्री राजगिरा, बाजरी किंवा ज्वारीची रोटी खाते. योग्य आहाराबरोबर अभिनेत्री व्यायामावर सुद्धा भर देते.