Anushka Sharma Virat Kohli Alibaug Villa: बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहली नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि आलिशान लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यांनी नुकतीच अलिबागमध्ये गुंतवणूक केली. त्यांनी ४० कोटी रुपयांची ५ एकर जमीन घेतली. यापूर्वीही त्यांनी अलिबागमध्ये १९ कोटी रुपयांची एक मालमत्ता खरेदी केली होती आणि त्यानंतर तिथे ‘हॉलिडे होम’ बनवण्यासाठी १३ कोटी रुपये खर्च केले होते. एका आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चर फर्मने डिझाइन केलेला हा व्हिला तब्बल १०,००० स्क्वेअर फूट जागेत पसरलेला आहे. या घराच्या बांधकामात नैसर्गिक दगडांचा, इटालियन मार्बलचा, कच्च्या ट्रॅव्हर्टाइनचा आणि तुर्की लाईमस्टोनचा वापर करण्यात आला आहे. यामुळे या घराला आलिशान लूक मिळाला आहे.
या हॉलिडे होममध्ये चार बेडरूम्स आणि चार बाथरूम्स आहेत. याचे डिझाइन ‘कॅलिफोर्निया-कोकण’ थीमवर आधारित आहे. पांढरा आणि मातीचा रंग, तसेच काळ्या आणि तपकिरी रंगाच्या शेड्स वापरून हे घर सजवलंय. घरात प्रवेश करताच शांत आणि प्रसन्न वाटतं. जिन्याजवळची एक खास भिंत इटालियन मार्बलने सजवली आहे. यामुळे लिव्हिंग रूम आणखी सुंदर दिसते.
विराट-अनुष्काचं अलिबागमधील घर
लिव्हिंग रूम खूप मोठी आणि मोकळी आहे. आणि स्विमिंग पूलच्या बाजूला असलेल्या मोठ्या काचेच्या खिडक्यांमुळे घरात भरपूर उजेड येतो. आर्किटेक्चरल डायजेस्टला दिलेल्या मुलाखतीत लिव्हिंग रूमबद्दल बोलताना विराट म्हणाला, “हॉलिडे होममध्ये माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात प्रवेश करताच मनात येणारी भावना. ती जागा अत्यंत शांत, आरामदायी आणि स्वतःच्या घरापासून दूर असूनही घरासारखी वाटणारी असायला हवी.”

विराट-अनुष्काच्या घरात टीव्ही नाही
विराट आणि अनुष्काच्या या घराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे एकही टीव्ही नाही. हे घर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी आहे. “इथे टीव्ही किंवा मनोरंजनाचं कोणतंही साधन नाही. इथे आम्ही एकत्र बसून भरपूर गप्पा मारतो,” असं विराटने स्पष्ट केलं. डायनिंग एरियाबद्दल विराट म्हणाला, “कुटुंबाबरोबर एकत्र बसून जेवणं हे माझ्यासाठी खूप खास आहे. कारण बालपणी मला असे क्षण फारसे अनुभवता आले नाहीत. माझा जास्तीत जास्त वेळ क्रिकेटच्या सरावात जायचा.”
विराट कोहलीच्या घरातील स्विमिंग पूलची खासियत
“काम हा माझ्या आयुष्याचा एक छोटासा भाग आहे, काम म्हणजेच आयुष्य नाही. त्यामुळे मला नेहमी घरी परत जाण्याची घाई असते,” असं विराटने सांगितलं. या घराच्या बाहेर स्विमिंग पूलच्या शेजारी बसण्यासाठी एक अत्यंत सुंदर जागा बनवण्यात आली आहे. इथे बाली येथील दुर्मीळ ‘सुकाबुमी’ दगडांनी सजवलेला, पाण्याचे तापमान नियंत्रित करणारा स्विमिंग पूल आणि जकुझी आहे.

या घरात कस्टमाइज्ड किचनही आहे. हे घर पूर्णपणे ऑटोमेटेड आहे. इथे सिर्केडियन लायटिंग, गॅस लीक डिटेक्टर्स आणि अॅडव्हान्स एअर व वॉटर फिल्टरेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे. या व्हिलामध्ये चार बेडरूम्स आणि चार बाथरूम्स असली, तरी मास्टर बेडरूम विराटला खूप आवडतं. “स्वतःची बेडरूमच अशी जागा असते, जिथे तुम्ही बाहेरच्या जगातून परत येता आणि विश्रांती घेता,” असं विराट म्हणाला.
मास्टर बेडरूमचे डिझाइनही घराच्या उर्वरित थीमप्रमाणेच पांढऱ्या, बेज आणि तपकिरी रंगांच्या शेड्समध्ये आहेत. टीव्हीसाठी बनवण्यात आलेली भिंत इटालियन मार्बलने सजवली आहे. “माझं कुटुंबच माझं पहिलं प्राधान्य आहे. मी क्रिकेट खेळण्यात व्यग्र असलो, तरी मला नेहमी घरी परतण्याची ओढ असते. मुलं, कुटुंब असले की घरी परतावं वाटतं. माझ्यामते, काम हा आयुष्याचा एक भाग आहे आणि आपण त्याचा समतोल साधला पाहिजे,” असं विराट या मुलाखतीत म्हणाला होता.
