आपल्या आवडत्या कलाकाराबरोबर एक फोटो असावा अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा असतेच. त्यासाठी ही चाहते मंडळी अनेक प्रयत्न करताना दिसतात. मग आपला आवडता कलाकार कुठेही दिसला की त्याच्या मागे फोटोसाठी पळतात. त्यातल्या त्यात विमानतळांवर बरेच सेलिब्रिटी स्पॉट होत असतात. त्यामुळे चाहते आवडत्या कलाकारांना याच ठिकाणी गाठतात. असाच एक चाहता त्याच्या आवडत्या गायकाबरोबर फोटो काढण्यासाठी विमानतळावर मागे मागे फिरत होता.
प्रसिद्ध गायक आणि रॅपर एपी ढिल्लन नुकताच विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी एक चाहता मागेमागे करत होता. मात्र एपी ढिल्लनने त्याला दूर केले. एपी ढिल्लनच्या चाहत्याबरोबरच्या या वर्तणूकीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या व्हिडीओमधील गायकाचं चाहत्याबरोबरचं वर्तन पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. तशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये चाहता एपी ढिल्लनबरोबर फोटो काढण्यासाठी येतो. मग एपी ढिल्लन त्याला सेल्फीसाठी पोज देतो. त्यानंतर दुसरा एक चाहता एपी ढिल्लनबरोबर फोटो काढतो. मग तो आधीचा चाहता पुन्हा एपी ढिल्लनला फोटोसाठी विनंती करतो. मात्र एपी ढिल्लन त्याला “आणखी किती फोटो काढशील?” असं म्हणतो. यानंतर तो चाहता गायकाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो.
त्यावर एपी ढिल्लन त्याला चिडून जवळ येण्यास मनाई करतो आणि “आता बस्स…” असं म्हणतो. एपी ढिल्लनची ही कृती अनेकांना आवडली नाही आणि याबद्दल नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “हा आता मोठा माणूस झाला आहे म्हणून असा वागत आहे”, “प्रेक्षक यांना सेलिब्रिटी करतात आणि हे त्यांच्याशी असं वागतात?”, “हा तर शाहरुख खान असल्यासारखा आव आणत आहे” अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, एपी ढिल्लनबद्दल सांगायचं झालं तर त्याचा जन्म पंजाबच्या गुरुदासपूरचा. पण शिक्षणामुळे त्याचे कुटुंबीय कॅनडात शिफ्ट झाले. एपी ढिल्लनने त्याच्या गायनाची सुरुवात २०१९ मध्ये ‘फेक’ आणि ‘फरार’द्वारे केली. एपी ढिल्लनने त्याच्या करिअरमध्ये अनेक गाणी गायली. २०२० च्या ट्रॅक ब्राऊन मुंडेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. या एका गाण्यामुळे तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला.