A. R. Rahman Talks About hans Zimmer & Ramayana : ‘रामायण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या पौराणिक चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.दोन भागांमध्ये येणारा हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या आणि महागड्या प्रोजेक्टपैकी एक मानला जात आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं बजेट जवळपास ४००० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
लोकप्रिय संगीतकार ए.आर.रहमान यांनी या चित्रपटासाठी प्रसिद्ध जर्मन संगीतकार हान्स झिमर (Hans Zimmer) यांच्याबरोबर काम करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या सहकार्याला भव्य आणि ऐतिहासिक सहकार्य असं म्हटलं आहे. ए.आर.रहमान यांनी Faridoon Shahryar यांच्याशी संवाद साधताना हान्स झिमर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. हान्स झिमर यांनी दोन ऑस्कर आणि चार ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत.
ए. आर. रहमान काय म्हणाले?
रहमान म्हणाले, “मला वाटतं हे एक भव्य सहकार्य आहे. आपल्या देश आणि संस्कृतीवर आधारित चित्रपटासाठी त्यांच्याबरोबर काम करणं खूप खास आहे. त्यांना जगासमोर, विशेषतः भारताबाहेरील प्रेक्षकांसाठी, आपल्या संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणून आणलं जात आहे.” ए.आर.रहमान पुढे म्हणाले की हान्स झिमर यांच्या जागतिक लोकप्रियतेमुळे या चित्रपटाकडे आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचेही लक्ष वेधले जाईल.
ते म्हणाले, “हान्स झिमर यांचं नाव ऐकून अनेक लोक हा चित्रपट नक्की पाहतील. विशेषतः काही प्रेक्षकांना भारतीय चित्रपटात हान्स झिमर यांनी काय काम केलं आहे, हे पाहण्याची उत्सुकता असेल.” रहमान यांनी झिमर यांच्या कलात्मक दृष्टिकोनाचं आणि अनेक पिढ्यांतील संगीतकारांवर असलेल्या त्यांच्या प्रभावाचंही कौतुक केलं.
ए.आर.रहमान म्हणाले, “हान्स झिमर यांनी अनेक भूमिका निभावल्या आहेत. ते खरे कलाकार आहेत आणि इतरांपेक्षा खूप वेगळा विचार करतात. त्यांनी एक वेगळाच दर्जा निर्माण केला असून अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्याबरोबर काम करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. हा भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे.”
ए.आर.रहमान यांनी ‘रामायण’चा 3D ट्रेलर पाहण्याचा अनुभवही सांगितला आणि चित्रपटाच्या भव्यतेचं व तांत्रिक दर्जाचं कौतुक केलं. ते म्हणाले, “हा माझ्या करिअरमधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. कथा तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि तिच्याबद्दल आपल्याला खूप आदरही आहे. पण या चित्रपटातील तंत्रज्ञान खरोखरच अद्भुत आहे. फक्त 3D ट्रेलर पाहतानाच जबरदस्त अनुभव आला. भारतीय सिनेमातच नाही, तर जगातही अशा प्रकारची कलाकृती मी यापूर्वी पाहिलेली नाही. 3D मध्ये याचं संगीत आणि साउंड खूपच अप्रतिम वाटतं.”
