AR Rahman Son AR Ameen Car Accident : संगीतकार ए. आर. रहमान यांचा मुलगा ए. आर. अमीन याचा सोमवारीमध्ये चेन्नईमध्ये अपघात झाला. अमीन प्रवास करीत असलेल्या ‘पोर्शे’ (Porsche) गाडीला दुसऱ्या गाडीची धडक बसल्याने हा अपघात घडला. त्यामध्ये अमीन व त्याचे मित्र किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने त्यांना कोणतीही मोठी गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातामुळे गायक ए. आर. अमीन याच्याबाबत काळजी व्यक्त केली जात होती. परंतु, आता अमीनने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून हा अपघात कसा झाला याबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे चाहत्यांची चिंता काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत ए. आर. अमीनने त्याच्या अपघाताबद्दल माहिती दिली आहे. अमीनने लिहिले, “काल विमानतळावर जात असताना मी माझ्या मित्राच्या कारमध्ये चालकाशेजारी (पॅसेंजर सीटवर) बसलो होतो. त्यावेळी आमचा किरकोळ अपघात झाला. परमेश्वराच्या कृपेने गाडीमधील आम्ही सर्व जण सुखरूप आहोत. माझे रक्षण करणाऱ्या आणि मला अपघातातून वाचवणाऱ्या परमेश्वराचे मी आभार मानतो.”
याचं महत्त्व शब्दांत मांडता येणार नाही – अमीन
पुढे त्याने लिहिले, “या अपघातामुळे माझ्याबद्दल काळजी व्यक्त करणाऱ्या आणि माझी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. मला मेसेज करून, आपुलकीने तब्येतीची चौकशी करणाऱ्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्याचे, माझ्या कुटुंबीयांचे, मित्रांचे मी आभार मानतो, या सर्वांचं महत्त्व मला शब्दांत मांडता येणार नाही. माझी आजी, वडील व जी. व्ही. अण्णा यांचे आशीर्वाद आणि त्यांनी दिलेली शिकवण यांमुळे मला नेहमीच एक संरक्षण मिळते. त्यांनी दिलेले संस्कार व शिकवलेली मूल्ये मी आयुष्यभर जपून ठेवेन आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करेन.”

ए. आर. रहमानची मुलगी व ए. आर. अमीनची बहीण गायिका खतीजा रहमान हिनेही सोशल मीडियावर पोस्ट करीत हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत माहिती दिली होती. तिने सांगितले, “अमीन विमानतळाकडे जात होता आणि त्याचा मित्र गाडी चालवत होता. अमीन पॅसेंजर सीटवर बसला होता. त्यांचा ज्या गाडीशी अपघात झाला, त्या गाडीनं लाल सिग्नल असूनही गाडी पुढे नेली आणि त्यामुळे हा किरकोळ अपघात झाला आहे. परमेश्वराच्या कृपेनं अमीन, त्याचा मित्र आणि दुसऱ्या गाडीतील व्यक्ती हे सर्व जण आता सुरक्षित आहेत”
ए. आर. अमीनच्या अपघाताबद्दल पोलिसांची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे चेन्नईतील गिंडी (Guindy) परिसरात एक लक्झरी एसयूव्ही (SUV) आणि कॅब ॲग्रीगेटरच्या हॅचबॅक गाडीची धडक झाली. रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणारी हॅचबॅक गाडी मुख्य लेनमध्ये आल्याने ही धडक झाली. हा अपघात पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला; परंतु या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अमीन, त्याचा मित्र आणि हॅचबॅक गाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली. प्राथमिक उपचारानंतर त्यांना ‘डिसचार्ज’ देण्यात आला. परंतु, आता दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
