Arbaaz Khan Property: दबंग, दबंग २, डॉली की डोली, पटना शुक्ला, बंदा सिंग चौधरी अशा अनेक चित्रपटांतून अरबाज खानने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तो अभिनयाबरोबर चित्रपट निर्माता म्हणूनही लोकप्रिय आहे. अरबाज खान अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता मात्र अभिनेता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
अरबाज खानने घेतले अपार्टमेंट
अरबाज खानने मुंबईत एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. आता हे अपार्टमेंट मुंबईत नेमके कुठे आणि त्याची किंमत किती आहे, हे जाणून घेऊ…
प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन पेपर्सनुसार फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हा व्यवहार झाला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अरबाजने घेतलेले हे अपार्टमेंट मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथे आहे. हे अपार्टमेंट लिंक रोडवरील ऑटोग्राफ रेसिडेन्सी प्रकल्पाचा भाग आहे. तसेच, हे अपार्टमेंट २७ व्या मजल्यावर आहे. या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया हा १,२४३ चौरस फूट आहे. त्याची प्रति चौरस फूट किंमत २२,००० पेक्षा जास्त आहे. तसेच, तेथे दोन पार्किंग स्पॉट्सदेखील आहेत.
कागदपत्रांनुसार, अरबाजने १७ फेब्रुवारी २०२६ रोजी अपार्टमेंट खरेदी केले. त्यासाठी त्याने १६ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. तसेच, ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले. सध्या या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. २०३० पर्यंत या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल.
अरबाज खानच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर जीक्यू रिपोर्टनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती ५०० कोटी इतकी आहे. चित्रपट निर्मिती हा त्याचा संपत्तीचा प्रमुख स्रोत आहे.
अरबाज खानच्या कामाबद्दल बोलायचे, तर अभिनेता काल त्रिघोरी या चित्रपटात दिसला होता. त्यामध्ये रितुपर्णा सेनगुप्ता, महेश मांजरेकर, आदित्य श्रीवास्तव, राजेश शर्मा व मुग्धा गोडसे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते.
आगामी काळात अरबाज खान बिहू अटॅक, श्रीदेवी बंगलो, केसर सिंह या चित्रपटांत दिसणार आहे. आता या चित्रपटांतील त्याच्या नेमक्या भूमिका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अरबाज अनेकदा सोशल मीडियावरील त्याच्या व्हिडीओ, पोस्ट यांमुळेदेखील मोठ्या चर्चेत असतो. पत्नी शूरा खानबरोबरचे त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसते. अरबाज आणि शूरा खान यांनी डिसेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांना मुलगी झाली आहे.
