Arbaaz Khan Kolkata fans incident : बॉलीवूड अभिनेता अरबाज खान हा कोलकाता दौऱ्यावर गेला होता. मात्र, त्याचा हा दौरा एका विचित्र घटनेमुळे जोरदार चर्चेत आला आहे. अरबाज खानची सुरक्षा यंत्रणा मोडून एका चाहत्याने प्रचंड गोंधळ घातला. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जबरदस्तीने अरबाज खानच्या गाडीत घुसल्याचे दिसून आले आहे. घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे अरबाज खानसुद्धा गोंधळून गेला होता आणि त्या ठिकाणी काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटीवर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
अरबाज खानच्या गाडीमध्ये बसला चाहता
अरबाज खान याचा मोठा चाहता वर्ग आहे. एअरपोर्टवर गेल्यानंतर अनेक चाहते त्याला भेटण्यासाठी येत असतात. पण कोलकत्यामध्ये अरबाजबरोबर अशी एक घटना घडली, ज्यामुळे एक चाहता त्याच्यासाठी डोकेदुखी ठरला. अरबाज खानचा चाहता थेट त्याच्या गाडीमध्ये शिरून बसला होता. व्हायरल व्हिडीओंमध्ये दिसत आहे की, अरबाज खान सुरक्षा रक्षकांसह त्याच्या गाडीमध्ये बसण्यासाठी जात होता. मात्र, काही क्षणांतच एक अनोळखी व्यक्ती परवानगीशिवाय त्यांच्या गाडीत शिरल्याचे दिसून आले.
त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला गाडीतून हाताला धरून बाहेर काढले. चाहता गाडीबाहेर येत नसल्यामुळे यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अचानक घडलेल्या या विचित्र प्रकारामुळे उपस्थित लोकांनाही धक्का बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती आणली नियंत्रणामध्ये
या अनपेक्षित प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नेमके काय घडले हे पाहण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी जमा झाले होते. घडलेला हा प्रकार पाहून अरबाज खानदेखील क्षणभर दचकल्याचे आणि गोंधळल्याचे दिसून आले. बॉडीगार्डने गाडीमध्ये घुसलेल्या तरुणाला बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणल्याचे दिसून आले आहे. यावेळी अरबाज खानसह गाडीमध्ये डान्सर टेरेन्स असल्याचे दिसून येत आहे. मात्र, घडलेल्या या प्रकारामुळे आणि चाहत्याच्या या वागण्यामुळे नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
वैयक्तिक आयुष्यामुळे अरबाज खान चर्चेत
अरबाज खान हा त्याच्या प्रोफेशनल लाईफसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. मलायका अरोरासह घटस्फोट झाल्यानंतर अरबाजने दुसरे लग्न केले आहे. अरबाज खान याने शुरा खानसह २४ डिसेंबर २०२३ रोजी निकाह केला. अरबाज व शुरा खान यांनी २०२५ मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला. सिपारा असे अरबाज खानच्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे. अरबाज खानला अभिनेत्री मलायका अरोरापासून २२ वर्षांचा मुलगा अरहान खान आहे. आणि आता तो चिमुकल्या लेकीचा बाबा झाला आहे.
