Archana Puran Singh Opens Up About Her Miscarriage : अर्चना पूरण सिंह व परमीत सेठी नेहमी कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांच्या आयुष्यातील घडामोडी यामार्फत शेअर करत असतात. अशातच आता अर्चना यांनी त्यांचा गर्भपात झाला त्यावेळचा प्रसंग सांगितला आहे.

अर्चना यांचे स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे. त्यामार्फत त्या अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच आता लेटेस्ट व्हिडीओमधून त्यांनी त्यांच्या गर्भपाताचा प्रसंग सांगत, त्यावेळी परमीत त्यांच्याबरोबर नसल्याची खंत व्यक्त केली आहे. यावेळी परमीत यांनीसुद्धा त्यावेळी त्यांना तितकी समज नव्हती आणि या गोष्टीबद्दल जागृकताही कमी होती म्हणून असं घडल्याचं म्हटलं आहे.

अर्चना पूरण सिंह यांनी सांगितला गर्भपाताचा प्रसंग

अर्चना यांनी यावेळी सांगितले की, लग्नानंतरच्या चार वर्षांनंतर त्या गरोदर राहिल्या होत्या, पण काही कारणांमुळे त्यांचा गर्भपात झाला. त्या म्हणाल्या, “मी पोटुशी राहिले होते, पण मी एका चित्रपटासाठी काम करत असताना माझा गर्भपात झाला. मला मूल हवं होतं, त्यामुळे त्या गर्भपातामुळे मला दु:ख झालेलं.” यापुढे परमीत म्हणाले, “तू ज्या परिस्थितीतून जात होती ते पाहून मला असं वाटलेलं की आपल्याला मुलं व्हायलाच हवी असं काही नाहीये. मी फक्त तुझ्याबरोबरही आनंदी होतोच. आपण इतके जवळ होतो की आपल्यामध्ये दुसऱ्या कोणासाठी जागाच नव्हती.”

अर्चना पूरण सिंह यांनी व्यक्त केली भीती

अर्चना पुढे म्हणाल्या, “मी तुला सांगितलेलं की मूल आपलंच असणार आहे, ते बाहेरचं दुसरं कोणीतरी नसेल.” पुढे त्यांनी परमीत यांना त्यावेळी मातृत्वाबद्दल तितकी जाण नव्हती.असं म्हटलं. अर्चना यांनी पुढे सचिन पिळगावकर यांच्या ‘एसी भी क्या जलीदी’ या चित्रपटासाठी काम करत असताना त्यांचा गर्भपात झाल्याचं म्हटलं. त्या म्हणाल्या, “मी ३४ वर्षांची होते आणि मला माझं खूप वय आहे असं वाटत होतं आणि कदाचित कधीच मुलं होणार नाहीत अशी भीती होती.”

अर्चना यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं की, त्या बँकाँकमध्ये असताना त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर त्या त्वरीत भारतात आल्या, पण तोवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते. त्यावेळी त्या भावनिकदृष्ट्या कठीण काळातून जात असतानाच त्या गरोदर असल्याचं त्यांना कळलं. त्या म्हणाल्या, “मला सतत भूक लागायची, मला कळलं नाही पण मी गरोदर होते.” पुढे अर्चना पती परमीत सेठ्ठी यांच्याबद्दल म्हणाल्या, “मी गर्भपात झाल्यानंतर पुन्हा गरोदर राहिल्यानंतर स्वत:ची व बाळाची काळजी घेत होते आणि हा फुटबॉल खेळत होता.”

परमीत सेठी पुढे म्हणाले, ‘मी त्यावेळी तुला समजून घेतलं नाही, मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. तुला पूर्णपणे बेड रेस्ट करायला सांगितलेलं आणि मी फुटबॉल खेळायला जात होतो. जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्ही स्वत:पुरता विचार करता. तुम्हाला फार गोष्टींबद्दलची माहिती नसते. तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे धावत असता, मला मी काय करत आहे हे कळत नव्हते.”