बॉलीवूडचे कलाकार हे विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या चित्रपटातील भूमिका, सोशल मीडियावरील पोस्ट व मुलाखतीदरम्यान केलेली वक्तव्ये यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग असतात. आता अभिनेत्री अर्चना पूरन सिंहने एका मुलाखतीत शाहरुख खानबद्दलची आठवण सांगितली आहे.

“शाहरुख सभ्य व्यक्ती आहे”

अभिनेत्री अर्चना पूरन सिंहने नुकतीच ‘बॉलीवूड बबल’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाच्या सेटवरील आठवणींना उजाळा दिला. या चित्रपटातील कोई मिल गया या गाण्याच्या शूटिंगची आठवण त्यांनी सांगितली आहे. त्यांनी म्हटले, “कुछ कुछ होता है या चित्रपटातील आम्ही कोई मिल गया या गाण्याचे शूटिंग मेहबूब स्टुडिओमध्ये करीत होतो. मला आठवतं की. या गाण्याचं शूटिंग कुठेतरी दुसऱ्या मजल्यावर सुरू होतं. मी पायांत हिल्सच्या चपला घातल्या होत्या. त्यामुळे डान्स केल्यानंतर चालणे अवघड झाले होते. मला बसायचे होते. मेकअप रूम थोड्या दूर होत्या. शाहरुख खानची व्हॅन जवळच होती, त्याने मला त्याच्या व्हॅनमध्ये आराम करण्यास सांगितले.

“मोठा ब्रेक असल्याने मी त्याच्या व्हॅनमध्ये झोपले. त्यानंतर शाहरुख तिथे आला असावा, तो बोलला ते शब्द मला अस्पष्टपणे ऐकू आले. ‘मी तसाही शूटसाठी जाणार आहे. त्यामुळे तिला झोपू दे.’ माझी झोप मोडू नये म्हणून तो फोनवर हळू आवाजात बोलत व्हॅनमधून निघून गेला. तो त्याच्या सहकलाकाराठी व्हॅनमधून निघून गेला हे लक्षात राहण्यासारखे आहे.”

त्याविषयी अधिक बोलताना अर्चनाने म्हटले, “त्याच्या या चांगल्या वागण्याचा चित्रपटाचे निर्माते यश जोहर यांना राग आला होता. त्यांनी त्याला विचारले की, तू बाहेर का आहेस? जा व्हॅनमध्ये जाऊन आराम कर. त्यावर शाहरुख खानने सांगितले, अर्चनाजी व्हॅनमध्ये झोपल्या आहेत. जेव्हा मी झोपून उठले तेव्हा मी त्याचा फ्रिजमधील काही मिठाईदेखील खाल्ली होती. शाहरुख खूप सभ्य व्यक्ती आहे.

हेही वाचा: “जान्हवीने वेळेत पलटी मारली हे…”, आधीच्या पर्वातील सदस्याचे वक्तव्य चर्चेत, “मला ती..”

यश चोप्रा निर्मित ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट १९९८ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर काजोल, राणी मुखर्जी, अनुपम खेर, अर्चना पूरन सिंह व सलमान खान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते. अर्चना पूरन सिंह आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसणार आहेत. नेटफ्लिक्सवर या शोचा दुसरा सीझन प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्ट, सैफ अली खान, रोहित शर्मा, ज्युनियर एनटीआर अशा अनेक दिग्गज व्यक्ती या शोला हजेरी लावणार आहेत.

दरम्यान, शाहरुख खानच्या चांगल्या स्वभावाबद्दल अनेक सहकलाकारांनी याआधी वक्तव्य केले आहे. अनेक कलाकारांनी तो कलाकार म्हणून जितका चांगला आहे, तितकाच तो म्हणूनदेखील चांगला आहे, असे म्हटले आहे.