Archana Puran Singh on relationship with Parmeet Sethi: अर्चना पूरण सिंग या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्या द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तसेच त्या युट्यूबच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात.

अर्चना पूरण सिंग आणि त्यांचे पती लोकप्रिय अभिनेते परमीत सेठी अनेकदा युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगतात. काही खासगी गोष्टींबद्दल वक्तव्य करतात.

आता एका व्हिडीओमध्ये त्यांनी ते जेव्हा प्रेमात पडले होते त्यावेळची आठवण सांगितली. तसेच त्यांच्या रिलेशनशिपबद्दलही वक्तव्य केले.

“ते वन नाईट स्टँड…”

ते म्हणाले की त्यांची पहिली भेट १९८८ मध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. त्या रात्री त्याच मित्रांबरोबर क्लबला गेल्यानंतर त्यांच्यात बोलणं सुरू झालं. परमीत सेठी म्हणाले, “ते वन नाईट स्टँड असणार होतं.”

जेव्हा त्यांच्यात बोलणे सुरू झाले, तेव्हा ते एकमेकांबद्दल फार गंभीर नव्हते. अर्चना म्हणाल्या, “माझं नुकतंच माझ्या एक्सबरोबर ब्रेकअप झालं होतं आणि त्याचंही त्याच्या एक्सबरोबर ब्रेकअप झालं होतं.आमचं ते नातं एका रात्रीपुरतं असणार होतं. आम्ही एकमेकांना सांगितलं होतं की आपल्यात जे काही आहे ते गंभीर नाही.”

पुढे रिलेशनशिपमध्ये आल्यानंतरही ते एकमेकांना आठवण करून द्यायचे की त्यांच्यातील नात्याचा फार गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही.

१९८७ ला प्रदर्शित झालेल्या जलवा चित्रपटातून अर्चना पूरणसिंग यांना लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे परमित सेठींना अर्चना यांच्यासारखी मुलगी त्यांना हो म्हणेल यावर विश्वास बसत नसे.

अर्चना एक आठवण सांगत म्हणाल्या की त्यांच्या नात्याच्या सुरुवातीच्या काळात परमीत नेहमी त्यांना तीन लाल गुलाब आणून द्यायचे. प्रत्येक गुलाबाकडे बोट दाखवत आय लव्ह यू म्हणायचे. यावर परमीत हसत म्हणाले, “माझ्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे तिच्यासाठी गुलाब आणण्यासाठी मी तिच्याकडूनच पैसे उधार घ्यायचो.”

अर्चना पुढे म्हणाल्या, “जेव्हा तो हे नियमितपणे करू लागला आणि माझ्याकडून पैसे उधार घेणंही सुरूच ठेवलं, तेव्हा मी त्याला म्हणाले होते की आता गुलाब आणणं बंद कर. तेव्हा तो आश्चर्याने म्हणालेला याचा अर्थ आपलं नातं थांबवायचं आहे का?”

आणखी एक आठवण सांगत अर्चना म्हणाल्या,”एकदा माझ्यावरील प्रेम व्यक्त करत त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे नाव घेतले होते. पण मला राग आला नाही. कारण आमचे नाते ४ महिन्यांचे होते आणि त्याचे आधीचे नाते हे ४ वर्षांचे होते.”

परमित सेठी यांना उद्देशून त्या म्हणाल्या, “मला त्याचं वाईट वाटलं नाही, कारण मला माहीत होतं की तू मला उद्देशूनच बोलत होतास. पण तू तिच्याबरोबर ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होतास आणि माझ्याबरोबर फक्त ४ महिने रिलेशनशिपमध्ये होतास. त्यामुळे चुकून तिचं नाव तुझ्या तोंडून निघणं साहजिकच होतं.”

दरम्यान, अर्चना पूरण सिंग आणि परमीत सेठी यांनी १९९२ ला लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला ३८ वर्षे पूर्ण झाली आहेत.