Javed Akhtar on Farhan Zoya upbringing and religion: ज्येष्ठ गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांना त्यांची पहिली पत्नी हनी इराणी यांच्यापासून फरहान आणि झोया ही दोन मुले आहेत. एका मुलाखतीत जावेद यांनी आपल्या मुलांच्या संगोपनाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी मुलांना घडवण्याचे संपूर्ण श्रेय पहिली पत्नी हनी इराणी यांना दिलं. कारण त्यांनी शबाना आझमींशी दुसरं लग्न केल्यानंतर हनी यांनीच मुलांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

फरहान आणि झोयाने स्वतःच्या हिमतीवर यश मिळवले – जावेद अख्तर

मुलांच्या यशाबद्दल बोलताना जावेद म्हणाले, “मला फरहान आणि झोयाचा खूप अभिमान वाटतो. ते यशस्वी आहेत किंवा उत्तम आयुष्य जगत आहेत म्हणून नाही, तर त्यांनी हे सर्व स्वतःच्या हिमतीवर मिळवलंय. त्यांच्या या यशात पालकांचा काहीही वाटा नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अत्यंत दर्जेदार काम करून हे स्थान मिळवलं आहे. यश, प्रसिद्धी किंवा पैशासाठी त्यांनी कधीही मर्यादा ओलांडल्या नाहीत किंवा कोणतेही अश्लील, वाईट सिनेमे बनवले नाहीत. त्यांनी कामाची आणि स्वतःची प्रतिष्ठा जपली, याचा मला खूप आनंद आहे.”

जावेद अख्तर यांनी पहिल्या पत्नीला दिले मुलांच्या संगोपनाचे श्रेय

भीती न दाखवता मुलांच्या मनात आदराची भावना कशी निर्माण केली, यावर जावेद म्हणाले, “याचे संपूर्ण श्रेय हनीला जाते. आम्ही वेगळे झालो तेव्हा झोया ११ वर्षांची आणि फरहान साडेनऊ वर्षांचा होता. तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा काळ होता. मी मुलांच्या संपर्कात नक्कीच होतो, पण ती हनीबरोबरच राहत होती. मुलांनी काय करावे, काय करू नये, त्यांना किती स्वातंत्र्य असावे आणि त्यांनी कोणती नैतिक मूल्ये जपायची, हे हनीनेच त्यांना शिकवले. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून त्यांना घडवण्यात हनीचा खूप मोठा वाटा आहे,” असं जावेद यांनी स्पष्ट केलं.

हसत हसत जावेद अख्तर पुढे म्हणाले, “हो, पण त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यात माझा थोडा वाटा नक्कीच आहे. मी पूर्वी खूप वाचन करायचो आणि मुले पालकांचेच अनुकरण करतात. आता मला सांगायला संकोच वाटतोय, पण ती दोघेही आता माझ्यापेक्षा जास्त वाचन करतात.”

‘आपण मुस्लीम आहोत का?’ सांगितला फरहानचा तो किस्सा

मुलांना कोणत्याही धर्माच्या चौकटीत न बांधल्याबद्दल सांगताना जावेद म्हणाले, “मी त्यांना कोणत्याही धर्माची ओळख करून दिली नाही. सामान्यतः मुलं ११-१२ वर्षांची झाली की त्यांना धर्माबद्दल शिकवलं जातं, पण मी तसं केलं नाही. फरहान ७-८ वर्षांचा असतानाचा एक किस्सा मला आठवतो. एक दिवस तो शाळेतून पळत आला आणि त्याने मला विचारलं, ‘आपण मुस्लिम आहोत का?’ मी त्याला सांगितलं- ‘हे बघ, तुझा जन्म मुंबई, पुणे, लंडन किंवा न्यू यॉर्क अशा कोणत्याही शहरात आणि कोणत्याही समुदायात होऊ शकतो. पण तू कुठल्या शहरात किंवा धर्मात जन्माला आलास यापेक्षा तू एक माणूस म्हणून कसा घडतोस, हे जास्त महत्त्वाचं आहे.’ त्यामुळे माझी मुलं पूर्णपणे अधार्मिक आणि धर्मनिरपेक्ष विचारांची आहेत.”