Arijit Singh Education : बॉलीवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंगने नुकतीच पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, अरिजीतचं संगीताशी अगदी लहानपणापासूनच अतिशय घट्ट नातं आहे. आपल्या आवाजानं लाखों रसिक श्रोत्यांना वेड लावणाऱ्या या गायकाचं शिक्षण माहितीय? चला जाणून घेऊ…
अरिजीतने कमी वयात संगीताचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. त्याच्या कुटुंबातील काही सदस्य संगीत क्षेत्राशी निगडीत होते. त्यामुळे घरातूनच त्याच्या सांगीतिक शिक्षणाची पायाभरणी झाली. त्यांच्या मामांनी त्याला भारतीय शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण दिलं, तर त्याची आईदेखील गायन करायची. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अरिजीतने पुढे संगीत क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला.
२५ एप्रिल १९८७ रोजी, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये अरिजीतचा जन्म झाला. मुर्शिदाबादमधील राजा बिजय सिंग हायस्कूल येथे त्याने शालेय शिक्षण घेतलं, तर श्रीपत सिंग कॉलेजमधून त्याने पदवीचं शिक्षण घेतलं. गायनाची आवड लहानपणापासूनच असल्याने पुढे त्याने राजेंद्र प्रसाद हजारी यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीत, तर धीरेंद्र प्रसाद हजारी यांच्याकडून तबला वादनाचं शिक्षण घेतलं.
अरिजीत सिंगच्या करिअरची सुरुवात
अरिजीतच्या करिअरची सुरुवात २००५ साली आलेल्या ‘गुरुकुल’ या रिअॅलिटी शोपासून झाली. या शोमध्ये त्याने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर तो ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रमातही दिसला. हा शो त्यानं जिंकला नसला, तरी या शोमुळे अनेकजण त्याच्या आवाजाचे चाहते झाले.
पुढे आपल्या मेहनतीच्या जोरावर २०११ साली त्याने इमरान हाश्मीच्या ‘मर्डर २’ या चित्रपटात गायनाची संधी मिळवली. या चित्रपटातील ‘फिर मोहब्बत’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं. त्यानंतर २०१३ मध्ये आलेल्या ‘आशिकी २’मधील ‘तुम ही हो’ या गाण्याने अरिजीतला प्रचंड यश आणि लोकप्रियता मिळवून दिली. या गाण्यामुळे तो घराघरांत ओळखला जाऊ लागला.
अरिजीत सिंगची गाजलेली गाणी
अरिजीत सिंगने ‘चन्ना मेरेया’, ‘अगर तुम साथ हो’, ‘राब्ता’, ‘केसरिया’, ‘गेरुआ’, ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि यांसारखी असंख्य सुपरहिट गाणी गायली आहेत. केवळ हिंदीच नव्हे; तर बंगाली, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि मराठी भाषांमध्येही त्यानं लोकप्रिय गाणी गायली आहेत.

