Vishal Dadlani Shares Post : अरिजीत सिंगने पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर चाहत्यांमध्ये तो मोठा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. अनेकांना त्यानं घेतलेल्या निर्णयाचा धक्का बसलाय, तर काहीजणांनी त्यांच्या निर्णयाला समर्थन दिलं आहे. संगीत क्षेत्रातले अनेक लोक अरिजीतच्या या निर्णयावर त्यांची मतं व्यक्त करीत आहेत. अशातच आता गायक-संगीतकार विशाल ददलानीनेही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विशालनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं कोणाचंही थेट नाव घेतलं नसून मनाच्या शांती किंवा समाधानाची काहीच शाश्वती नसल्याचं त्यानं या पोस्टमधून म्हटलं आहे. तसंच आयुष्य मनापासून जगण्याचा एक सल्लादेखील त्यानं दिला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये विशाने नक्की काय म्हटलंय? चला जाणून घेऊ…
इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये विशालने लिहिलंय, “काही शिकलात? यश हे मनाची शांती किंवा समाधानाची हमी देत नाही. तुमच्याकडे असलेली संपत्तीसुद्धा सुरक्षिततेची हमी देत नाही. आपलं जीवन हे खूप विचित्र आहे आणि ते खूपच कमी आहे. त्यामुळे स्वत:बद्दल स्वतःला खोटं सांगून एकही क्षण वाया घालवू नका. कोणीतरी तुम्हाला काय व्हावं असं सांगितलं, तर तसंच बनण्याचा प्रयत्नही करू नका. आयुष्य भरभरून जगा, हाच माझा तुम्हाला सल्ला आहे.”
विशाल ददलानीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट
अरिजीतच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर श्रेया घोषाल म्हणाली…
याआधी गायिका श्रेया घोषालनेही अरिजीतच्या निवृत्तीच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली होती. आपल्या भावना व्यक्त करत तिने म्हटलेलं, “अरिजीत आता पुढे काय सादर करतोय, ते ऐकायला आणि अनुभवायला मी खूप उत्सुक आहे. मी कधीही याला ‘एक युगाचा शेवट’ म्हणू शकत नाही. अशा प्रतिभावान कलाकाराला ठराविक पद्धतींनी परिभाषित करता येत नाही. प्रिय अरिजीत आता उंच भरारी घेण्याची वेळ आहे.”
गायक अरिजीत सिंगने निवृत्तीची पोस्ट शेअर करीत म्हटलं…
मंगळवारी, २७ जानेवारी रोजी अरिजीतने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने निवृत्तीची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, “हॅलो, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मागील अनेक वर्षांत मला दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. मला सांगताना आनंद होत आहे की आता मी पार्श्वगायक म्हणून कोणतीही नवीन कामं स्वीकारणार नाही. मी हा प्रवास संपवत आहे. हा एक अद्भुत प्रवास होता.”

