Bollywood Singer Arijit Singh : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील जियागंज या लहान शहरातून आलेला अरिजीत सिंग आज प्रसिद्ध गायक आहे. त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. अरिजीत अनेकदा आपल्या जियागंज या मूळ गावी जातो आणि तिथं अगदी साधेपणानं आयुष्य जगतो. नुकत्याच एका मुलाखतीत गायकाच्या वडिलांनी त्याची गावाविषयीची ओढ आणि तिथून सुरू झालेल्या त्याच्या गायनाच्या प्रवासाबद्दल प्रतिक्रिया दिली.
The Telegraph India शी बोलताना अरिजीतचे वडील सुरिंदर सिंग म्हणाले, “आमच्या पूर्वजांचं घर लाहोरजवळ होतं; पण विभाजनानंतर माझे वडील आणि त्यांचे तीन भाऊ लालगोला येथे आले. त्यानंतर आम्ही जियागंजमध्ये स्थायिक झालो. तिथूनच अरिजीतचा संगीताचा प्रवास सुरू झाला. तो तिथल्या गुरुद्वारात आई अदिती सिंगबरोबर गायन करत असे.”
अरिजीतचे मुंबईत अपार्टमेंट अन् ऑफिस आहेत, पण…
पुढे अरिजीतचे वडील म्हणाले, “अरिजीतचे मुंबईत अपार्टमेंट आणि ऑफिस आहे; पण त्याला इथे (जियागंज) रहायला आवडते. त्याची मुलं इथल्या स्थानिक शाळेत शिकतात. हे ठिकाण खूप शांत आहे. माझा मुलगा मुंबईत राहू शकला नाही आणि परत येथे आला. त्याचं गावाशी खास नातं आहे. त्याच्याबद्दल ‘तुमचा मुलगा काय करत आहे? त्याचं पुढचं प्रोजेक्ट काय आहे?’ असं लोक जेव्हा विचारतात तेव्हा मला अरिजीतचा अभिमान वाटतो.”
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ए. आर. रहमान अरिजीतबद्दल म्हणाले होते, “त्याला एकांतात राहणे आवडते, तो त्याच्या गावातूनच काम करतो आणि ते खूपच छान आहे.” अरिजीत त्याच्या गावी ‘हेशल’ नावाचे एक स्वस्त भोजनालयही चालवतो. तिथे पैशांची अडचण असलेल्यांना फक्त ४० रुपयांत जेवण दिले जाते.
The Music Podcast ला दिलेल्या मुलाखतीत अरिजीत म्हणाला होता, “मला स्वत:साठी ते पैसे खर्च करायचे नाहीत. मला इतरांसाठी पैसा निर्माण करायचा आहे. मला आरोग्य क्षेत्रात काम करायचे आहे. आपत्कालीन परिस्थितीत योग्य उपचार मिळावेत यासाठी ठिकठिकाणी लहान रुग्णालये उभारायची आहेत.”
दरम्यान, निवृत्तीची घोषणा केल्यानंतर नुकतंच त्याचं स्वतंत्र नवीन गाणं रिलीज झालं आहे. ‘रैना’ असं या गाण्याचं नाव असून, गाण्याला शेखर रावजिया यानं संगीत दिलं आहे. निवृत्तीनंतरचं पहिलं गाणं प्रसिद्ध होताच चाहत्यांनी कमेंट्समध्ये अरिजीतचं भरभरून कौतुक केलं.
हे गाणं २७ फेब्रुवारी रोजी रिलीज झालं. त्यानंतर ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडत आहे. आता त्याच्या पुढील गाण्याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
