Arijit Singh New Song Release : बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगनं काही दिवसांपूर्वी पार्श्वगायनातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. यामुळे साहजिकच त्याच्या असंख्य चाहत्यांचा हिरमोड झाला. पण अरिजीतनं संपूर्ण गायनातून निवृत्ती घेतलेली नाही. त्यानं पार्श्वगायन करणार नसल्याचं सांगितलंय. आपल्या स्वतंत्र गाण्यांतून तो रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. अशातच त्याचं निवृत्ती जाहीर केल्यानंतरचं पहिलं स्वतंत्र गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही आठवड्यांनी अरिजीतचं पहिलं स्वतंत्र गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ‘रैना’ असं या गाण्याचं नाव असून Garuudaa Music या यूट्यूब चॅनेलवर ह गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार शेखर रावजियाने संगीत दिले असून अरिजीतनं हे गाणं गायलं आहे. तर प्रिया सरैया यांनी गीतलेखन केले आहे.
अरिजीत सिंगचं ‘रैना’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
निवृत्तीनंतरचं पहिलं गाणं प्रसिद्ध होताच चाहत्यांनी कमेंट्समध्ये अरिजीतचं भरभरून कौतुक केले. २७ फेब्रुवारी रोजी रिलीज झाल्यानंतर, संपूर्ण गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अरिजीतच्या गायनाने चाहते मंत्रमुग्ध झाले होते. अनेकांनी अरिजीतचं कौतुक करीत त्याला देशातील सर्वोत्तम गायक असल्याचे म्हटलं आहे. “मी हे गाणं ऐकून वेडा झालो आहे”, “हे गाणं ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले”, “निवृत्त झाल्यानंतरही, अरिजीत अजूनही उत्तम स्वतंत्र संगीत बनवत आहे”, “अरिजीतकडून अशाच काही गाण्यांची आम्ही वाट पाहत आहोत” या आणि अशा अनेक प्रतिक्रियांमधून चाहत्यांनी या गाण्याविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अरिजीतची प्रलंबित गाणी लवकरच प्रदर्शित होणार
अलीकडेच अरिजीतने एक्स (पूर्वीचे ट्विटर) द्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. या संवादात त्याने सांगितले की, तो आता नवीन गाणी स्वीकारत नसला तरी आधीपासून प्रलंबित असलेली अनेक गाणी पूर्ण करत आहे. ही गाणी पुढील काही महिन्यांत, कदाचित पुढील वर्षात प्रदर्शित होतील.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत अरिजीतनं चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभार मानले. तसेच या कठीण मिळालेल्या आपुलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रलंबित असलेली गाणी हळूहळू प्रदर्शित होत राहतील, असेही त्याने स्पष्ट केले. तसंच शेवटी त्याने आपल्या चाहत्यांना वाचन करण्याचा, प्रेम करण्याचा आणि ध्यान करण्याचा सल्लादेखील दिला.
