Arijit Singh To Join Politics After Quitting Playback Singing? बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय गायक अरिजीत सिंगने पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली आहे. जी कामे आधीपासून घेतली आहे, ती पूर्ण करणार, त्यानंतर चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करणार नसल्याचं अरिजीत सिंगने म्हटलं आहे. २७ जानेवारी रात्री त्याने हा निर्णय जाहीर केल्यानंतर चाहत्यांना व संगीत विश्वाला मोठा धक्का बसला. अवघ्या ३८ व्या वर्षी अरिजीत सिंगने निवृत्ती घेतली.

पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्यानंतर अरिजीत सिंग काय करणार? याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अरिजीत राजकारणात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गायक अरिजित सिंग राजकीय पक्ष सुरू करण्याचा विचार करत असल्याची चर्चा होत आहे. पण तो राजकीय पक्षाची स्थापना लवकरच करणार नाही. २०२६ च्या बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तो पक्ष स्थापन करू शकतो.

येत्या काळात अरिजीत सिंग निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकतो. गायकाने राजकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तयारी आधीच सुरू केल्याचे वृत्त एनडीटीव्हीने अरिजीत सिंगच्या जवळच्या लोकांचा हवाला देत म्हटलं आहे. कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असलेला अरिजीत सिंग पश्चिम बंगालमध्ये राहणं पसंत करतो. तो मूळचा पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जियागंजचा रहिवासी आहे.

अरिजीत सिंगने निवृत्तीच्या पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

“हॅलो, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. इतकी वर्षे श्रोते म्हणून तुम्ही मला दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. मी आनंदाने जाहीर करतोय की यापुढे पार्श्वगायक म्हणून मी कोणतेही नवीन काम घेणार नाही. मी निवृत्ती घेतोय. हा प्रवास खूप सुंदर होता,” असं अरिजीत सिंगने पोस्टमध्ये लिहिलं. यानंतर त्याने एक्सवर पोस्ट करून तो गाणी गाणार नसला तरी संगीत निर्मिती करत राहणार आहे, असं म्हणाला होता. नव्या गायकांना संधी मिळावी, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली होती. गायक म्हणून निवृत्ती घेतल्यावर भारतीय शास्त्रीय संगीताकडे वळणार असल्याचं अरिजीतने सांगितलं.

अरिजित सिंगची हिट गाणी

अरिजित सिंगने एका दशकाहून अधिक काळ संगीत विश्वावर राज्य केलं. शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंह यांच्यासह अनेक स्टार्सना अरिजित सिंगने आवाज दिला. त्याच्या हिट गाण्यांमध्ये ‘तुम ही हो’, ‘लाल इश्क’, ‘राबता’, ‘कभी जो बादल बरसे’, ‘केसरिया’सह आणि ‘आज फिर’ यांचा समावेश आहे.