Arjun Kapoor Weight Loss Transformation: बॉलीवूडमधील कलाकार त्यांच्या फिटनेसबाबत नेहमीच जागृक असतात. पडद्यावर भूमिका साकारताना हे कलाकार भूमिकेच्या गरजेप्रमाणे अनेकदा वजन कमी करतात किंवा वाढवतात. सिनेमांमध्ये झळकण्यासाठी कलाकार हे त्यांच्या शरीराची आणि चेहऱ्याची काळजी घेत असल्याचे दिसून येते. अनेक कलाकार हे त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. अगदी वयाची साठी पार केलेले बॉलीवूड कलाकारसुद्धा पूर्णपणे फिट असल्याचे दिसून येते. कलाकार असो वा सामान्य व्यक्ती, निरोगी शरीरयष्टी असणं ही तर प्रत्येकाची इच्छा असते. दरम्यान, बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने लठ्ठपणातून बाहेर येत फिटनेस मिळवला आहे. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याचा हा प्रवास आणि फिटनेसविषयी त्याचे विचार मांडले आहेत.

अभिनेता अर्जुन कपूर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि रिलेशनशिपमुळे चर्चेमध्ये असतो. अर्जुनने २०१२ मध्ये इश्कजादे या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुकही झाले होते, पण अभिनेता म्हणून पदार्पण करण्यापूर्वी त्याने शरीरयष्टीवर पूर्णपणे काम केले होते. लठ्ठपणातून बाहेर येत अर्जुन कपूरने फिटनेस मिळवला होता. आता त्याने निरोगी शरीर मिळवल्याच्या प्रवासाबद्दल आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबाबत त्याचे मत मांडले आहे. लठ्ठपणातून बाहेर आल्यानंतर त्याच्या शरीरावर नाही तर विचारांमध्येही खूप बदल झाल्याचे अर्जुनने सांगितले आहे.

चित्रपटांच्या गरजेनुसार व्यायाम करत होतो – अर्जुन

‘एस्क्वायर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्जुन कपूरने त्याच्या फिटनेस आणि मानसिक आरोग्याबाबत विचार मांडले आहेत. अर्जुन कपूर म्हणाला, “गेल्या काही वर्षांत माझ्या फिटनेस, मानसिक आरोग्य आणि कामाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. हा बदल फक्त शारीरिक नाही, तर मानसिक आरोग्यावरसुद्धा झाला आहे. आधी मी चित्रपटांच्या गरजेनुसार किंवा विशिष्ट दिसण्यासाठी व्यायाम करायचो. पण, आता मात्र माझ्यासाठी फिटनेस म्हणजे फक्त बॉडी बनवणं नाही, तर स्वतःची काळजी घेणं आहे.

अर्जुन कपूर म्हणाला, “अनेक वर्षे मिळू न शकणाऱ्या गोष्टींच्या मागे पळत होतो, पण आता मी जरा धीर धरायला आणि संयम ठेवायला शिकलो आहे. चांगल्या आयुष्यासाठी काही गोष्टींबाबत मर्यादा घालायचं शिकलो आहे. चांगली लाईफस्टाईल आणि सकारात्मक विचारांचा स्वीकार करतो आहे. आधी फक्त चित्रपटांसाठी फिटनेस मिळवत होतो, त्यामुळे खूप थकल्यासारखं वाटायचं. पण, आता मी फिटनेसकडे स्वतःच्या आरोग्यासाठी आणि मानसिक समाधानासाठी पाहतो.”

हा दबाव मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप थकवणारा – अर्जुन

पुढे तो म्हणाला, “मी कधीच प्रयत्न करण्यामध्ये कमी पडलो नाही. मात्र, माझं शरीर इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देतं. एखादी व्यक्ती तीन महिने व्यायाम केल्यावर जे मिळवते, त्यासाठी मला सहा महिने लागू शकतात, त्यामुळे आता मी स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवलं आहे आणि या प्रवासाचा आनंद घ्यायला शिकलो आहे. गेल्या काही वर्षांत मी ५० किलो वजन कमी केलं, त्यानंतर आणखी २० किलो केलं. अभिनेता झालो आणि नंतर पुन्हा प्रेक्षकांसमोर विशिष्ट प्रकारे दिसावं याचा दबाव असल्यानं वजन वाढवलं. अशा प्रकारचा दबाव मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप थकवणारा असतो. पण, यावेळी फिटनेसचा कोणताही ठराविक उद्देश नव्हता. मी तो फक्त स्वतःसाठी व्यायाम केला आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला.”

अर्जुन कपूर म्हणाला, “मी सर्वांत आधी माझ्या व्यायामाची वेळ बदलली आणि सकाळी वर्कआउट करण्यास सुरुवात केली. आधी उशिरा झोपायचो आणि दिवसभर आळसवायचो. पण, आता दिवसाची सुरुवात व्यायामाने केल्यामुळे माझ्यात शिस्त आली. मी माझा दिनक्रम ठरवला आणि घराबाहेर पडण्याआधी व्यायाम करू लागलो. यामुळे धावपळ करण्याऐवजी प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येतं. अशा छोट्या सवयींनी माझ्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल घडवून आणला.”

अर्जुनचं १६व्या वर्षी सुमारे १५० किलो वजन

अभिनेता अर्जुन कपूरचे आधी वजन वाढलेले होते. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी त्याचं सुमारे १५० किलो वजन होतं. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने स्वतःवर मेहनत घेत जवळपास चार वर्षांत तब्बल ५० किलो वजन कमी केलं. मात्र, चित्रपटसृष्टीत विशिष्ट दिसण्याच्या दबावामुळे त्याचं वजन पुन्हा वाढलं. आता मात्र इतरांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या आरोग्याला आणि मानसिक समाधानाला प्राधान्य देत असल्याचं अर्जुनने सांगितलं आहे.