Arshad Warsi Talks About His Childhood : अर्शद वारसी बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याने त्याच्या विनोदीशैलीने आजवर अनेकांचं मनोरंजन केलं आहे. अर्शद वारसीने अभिनयाचा कोणताही वारसा नसताना स्वबळावर इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. पण, हा प्रवास अर्शदसाठी खूप कठीण होता. अभिनेत्याने त्याच्या संघर्षकाळाबद्दल सांगितलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्शद वारसीने तो १६ वर्षांचा असतानाच त्याच्या आई-वडिलांचं निधन झाल्याने त्याला किती संघर्ष करावा लागला याबद्दल सांगितलं आहे. ‘लल्लनटॉप’शी संवाद साधताना अर्शदने याबद्दल सांगितलं आहे. यावेळी अभिनेत्याने त्याचे वडील उर्दू कवी अहमद अली खान यांच्या आठवणीसुद्धा सांगितल्या आहेत.
मुलाखतीत अर्शद म्हणाला, “माझ्या वडिलांचं नाव अहमद अली खान असं होतं. मी असं ऐकलंय की ते हरमोनियम वाजवायचे, शायरी करायचे आणि उर्दूचे जाणकार होते. मी या सगळ्याबद्दल ऐकलं आहे, कारण मी लहान असल्यापासून बॉर्डिंग शाळेत होतो, त्यामुळे मी फक्त सुट्टयांमध्ये घरी यायचो आणि सुट्ट्यांमध्ये मला नाही वाटत कोणत्याही मुलाला त्याच्या वडिलांच्या शायरी ऐकायला आवडत असतील.”
वडिलांबद्दल अर्शद म्हणाला, “मला असं वाटतं की माझ्याकडे असलेली हसवण्याची कला ही त्यांच्याकडूनच आली आहे. ते सतत हसत असायचे. पण, ते खूप वाईट व्यावसायिक होते. त्यांनी जे काही कमावलं ते सगळं त्यांनी लोकांमध्ये वाटून टाकलं. मला आठवतंय, एकदा त्यांनी त्यांच्या मित्राला सोन्याचं लाईटर दिलं होतं. एकदा त्यांनी माझ्या काकांना महागडी गाडी भेट म्हणून दिली होती. मला त्यांच्या स्वभावातून हे शिकायला मिळालं की जर तुम्ही दोन्ही हाताने दान केलं तर तुमच्याकडे काहीच शिल्लक राहणार नाही आणि तुम्ही सगळं गमावून बसाल.” अर्शदने याच मुलाखतीत त्याच्या वडिलांच्या ग्रँट रोड येथे दोन इमारती होत्या, पण त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांनी त्या इमारतीही गमावल्याचे म्हटलं.
१७व्या आई-वडिलांचं झालं निधन
वडिलांबद्दल अर्शद पुढे म्हणाला, “मी १६-१७ वर्षांचा असताना माझे आई-वडील दोघांचं निधन झालं. मी माझं आयुष्य जगत होतो, पण त्या रात्रीनंतर मी अचानक मोठा झालो. मी मित्रांबरोबर फिरणं वगैरे सगळं बंद केलं आणि काम करायला सुरुवात केली.”
