Aruna Irani Marathi Lavani : अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री अरुणा इराणी यांनी करिअरमध्ये चढ-उतार पाहिले आहेत. एकेकाळी अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सुपरस्टारसोबत काम करणाऱ्या अरुणा इराणी यांना नंतर कमी मानधनातही काम स्वीकारावे लागले. इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख कायम राहावी आणि आपण अजूनही काम करण्यासाठी तयार आहोत, हे दाखवण्यासाठी त्यांनी अवघ्या अडीच हजार रुपयांत मराठी चित्रपटात लावणी केली होती. चित्रपटसृष्टीतील अनुभव अभिनेत्री अरुणा इराणी यांनी शेअर केले आहेत.

अभिनेत्री अरुणा इराणी नुकत्याच ‘तुम हो ना घर की सुपरस्टार’ या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी चित्रपटविश्वामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आलेले प्रचंड यश आणि त्यानंतर तीन वर्षे कोणतेही काम न मिळाल्याचा अनुभव सांगितला आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलीवूड गाजवल्यानंतर अगदी कमी पैशांमध्ये काम स्वीकारावे लागल्याचे त्यांनी सांगितले. करिअरमध्ये आलेले यश-अपयश, अनुभव आणि या क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी दाखवलेले धैर्य याबाबत अभिनेत्री अरुणा इराणी यांनी किस्से सांगितले आहेत.

अचानक चित्रपटांमध्ये काम मिळणे झाले बंद

अभिनेत्री अरुणा इराणी म्हणाल्या, करिअरच्या सुरुवातीला ‘बॉम्बे टू गोवा’ आणि ‘कारवाँ’ असे दोन चित्रपट केले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि ते सुपरहिट ठरले. अनेक महिने हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत होते. मात्र, यानंतर अशी वेळ आली की तीन वर्षे कोणतेही काम मिळाले नाही. अचानक कोणताही चित्रपट मिळणे बंद झाले. तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा काम करण्याचे ठरवले, पण काम सुरू केले ते मराठी चित्रपटातून. मराठी चित्रपटामध्ये लावणी सादर करत पुन्हा एकदा चित्रपट करण्यास सुरुवात केल्याचे अभिनेत्री अरुणा इराणी यांनी सांगितले.

‘अंधाळा मारतो डोळा’ चित्रपटामध्ये केली लावणी

अभिनेत्री अरुणा इराणी म्हणाल्या की, स्टुडिओमधून बसून राहून मला घ्या असे म्हणू शकत नव्हते, यामुळे मराठी चित्रपटामधून पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी मिळाली आणि ती मोठ्या हिमतीने मी स्वीकारली. मला हे दाखवून द्यायचे होते की मी अजून जिवंत आहे आणि काम करू शकते. मी संधीची वाट पाहत होते आणि देवाच्या कृपेने मला मराठी चित्रपटामध्ये लावणी करण्याची संधी मिळाली. मी एक निमित्त शोधत होते आणि दादा कोंडके यांच्या ‘अंधाळा मारतो डोळा’ या चित्रपटातून ते मिळाल्याचे अभिनेत्री अरुणा इराणी यांनी नमूद केले आहे.

लावणी स्वीकारणे हा निर्णय फायदेशीर

चित्रपटसृष्टीतील अनुभव सांगताना अरुणा इराणी म्हणाल्या की, लावणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जुने दिवस आठवत होते. त्यावेळी मला वाटत होते की, हे काम मी कसे करणार.. अमितभाईंसह लीड हिरोईन म्हणून काम केल्यानंतर २५०० रुपयांसाठी लावणी करत होते. पण, मी स्वतःला समाजवले की जायलाच पाहिजे आणि हे काम केलेच पाहिजे. पण, ती लावणी स्वीकारणे हा निर्णय माझ्यासाठी फायद्याचा ठरला, कारण तिथेच राज कोहलींसह भेट झाली आणि करिअर पुन्हा एकदा जोमाने सुरू झाल्याचे अभिनेत्री अरुणा इराणी यांनी सांगितले आहे.