Aruna Irani Reveals Rekha Got Her Thrown Out Of a Film: बॉलीवूड अभिनेत्री अरुणा इराणी या १९७० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. अनेक चित्रपटांत काम करूनही त्या बहुतांश वेळा सहाय्यक भूमिकाच करताना दिसल्या.
अरुणा इराणी रेखा यांच्याबद्दल काय म्हणाल्या?
अरुणा इराणी यांनी एका मुलाखतीत त्यांनी प्रमुख भूमिका का साकारल्या नाहीत यावर वक्तव्य केले होते. चित्रपटातील प्रमुख भूमिका गमावल्या त्याची अनेक कारणे होती. याला त्यांची मैत्रीण रेखादेखील जबाबदार होत्या असे त्या म्हणाल्या होत्या.
मंगळसूत्र’ या चित्रपटातील दुय्यम प्रमुख भूमिकेसाठी अरुणा इराणी यांची निवड झाली होती. मात्र, रेखा यांनी त्यांना चित्रपटातून काढून टाकले. याबरोबरच रेखा यांनी इतर चित्रपटांतील अरुणा यांचे सीन कमी केले होते, कारण त्यांना वाटायचे अरुणा इराणी उत्तम अभिनेत्री आहेत.
लेहेरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत अरुणा इराणी यांनी रेखाबरोबर ‘औरत औरत औरत’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, “निर्मात्यांमुळे हा चित्रपट बनण्यास सहा वर्षांचा कालावधी लागला. त्या चित्रपटातील भूमिका चांगली होती, प्रमुख भूमिका होती.
अनेक कलाकार तशी भूमिका साकारण्यास मिळावी यासाठी प्रयत्न करतात. पण, अनेक लोकांमुळे चित्रपटातील माझी भूमिका कमी करण्यात आली. रेखासुद्धा त्यापैकीच एक होत्या. त्या म्हणायच्या की अरुणाची भूमिका खूप चांगली आहे.”
अरुणा यांच्याबरोबर मैत्री असूनही रेखा यांनी एका चित्रपटातून त्यांना काढून टाकले होते. अरुणा इराणी म्हणालेल्या, “माझी चांगली मैत्रीण असूनही रेखा यांनी मला एका चित्रपटातून काढून टाकले होते. ती आजही माझी मैत्रीण आहे. पण जेव्हा तिने मला ‘मंगळसूत्र’ चित्रपटातून काढले तेव्हा मी निर्मात्यांना विचारले की मला भूमिकेसाठी मानधन देऊनही तुम्ही मला चित्रपटातून का काढले? त्यावर मला निर्मात्यांनी असे सांगितले होते की तू या चित्रपटात काम करावं अशी रेखाची कधीच इच्छा नव्हती.
“जेव्हा मी रेखाला तिने असे का केले असे विचारले, तेव्हा ती मला म्हणाली की, जर तू भावनिकरित्या भूमिका उत्तम साकारलीस तर तुझ्यासमोर मी खलनायिकेसारखी दिसेन.”
‘मंगळसूत्र’ या चित्रपटात रेखा यांच्याबरोबरच अनंत नाग आणि प्रेमा नारायण हे प्रमुख भूमिकेत दिसले होते