Senior Actress talks about her romantic role with Govinda: अरुणा इराणी यांनी बॉलीवूडमध्ये ५० वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. त्यांनी १९६१ ला प्रदर्शित झालेल्या ‘गंगा जमुना’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी १९६७ ला प्रदर्शित झालेल्या ‘फर्ज” या चित्रपटातून सर्वांचे लक्ष वेधले.

‘कारवाँ’, ‘बॉम्बे टू गोवा’, बॉबी हे त्यांचे चित्रपट गाजले. अरुणा इराणी यांनी सहायक भूमिका साकारत स्वत:ची वेगळी भूमिका निर्माण केली. त्यामध्ये दो फूल, फकिरा, रेड रोज, रॉकी, सरगम, पेट प्यार और पाप, दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे, कुछ कुछ होता है, बेटा असे त्यांचे चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजले.

१९९४ ला प्रदर्शित झालेला राजा बाबू, १९९९ ला प्रदर्शित झालेला हसीना मान जायेगी, २००० ला प्रदर्शित झालेला बुलंदी, २००१ सालचा इंडियन व २००५ ला प्रदर्शित झालेल्या मितवा या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांचे कौतुक झाले.

हसीना मान जायेगी हा सिनेमा प्रचंड गाजला. गोविंदा, करिश्मा कपूर, संजय दत्त, पूजा बत्रा, कादर खान, परेश रावल, अरुणा इराणी, अनुपम खेर हे आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत होते.

चित्रपटात अरुणा इराणी गोविंदाबरोबर फ्लर्ट करताना, त्याच्याबरोबर रोमान्स करताना दिसल्या होत्या. नुकतीच अरुणा इराणी यांनी मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी यावर वक्तव्य केले. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत, हे जाणून घेऊ…

“अचानाक रोमँटिक भूमिका साकारली, तर…”

अरुणा इराणी यांनी नुकतीच ‘रेडिओ सिटी’ ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना मी सुरुवातीला नकार दिला होता; पण त्यांनी माझी समजूत घातली.

अभिनेत्री म्हणाल्या, “मी डेव्हिडजींना म्हणाले होते की, मी प्रत्येक चित्रपटात त्याच्या आईची भूमिका साकारते. माझी प्रतिमा तशीच निर्माण झाली आहे. जर मी गोविंदाबरोबर अचानाक रोमँटिक भूमिका साकारली, तर लोक ते स्वीकारणार नाहीत. या भूमिकेसाठी इतर कोणाला तरी घ्या. मला ही भूमिका साकारायची नाही.”

त्या पुढे म्हणाल्या, “मी जरी त्यांना ती भूमिका साकारणार नाही, असे सांगितले असले तरी डेव्हिडजी त्यांच्या निर्णयावर ठाम होते. ते मला म्हणाले की, अरुणाजी तुम्हीच ही भूमिका साकाराल आणि लोकांना तुमची ही भूमिका आवडेल. मला भीती वाटत होती; पण डेव्हिडजींचा अंदाज खरा ठरला. लोकांना माझी रोमँटिक भूमिका आवडली.”

गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत त्या म्हणाल्या, “मला संकोच वाटत होता. मी विचार करत असे की, जर लोकांनी ही भूमिका स्वीकारली नाही तर? मात्र, गोविंदानं मला प्रोत्साहन दिलं. मी सीनचा आधी सराव करत असे, त्यानंतर शूटिंग करत असे. आम्ही सेटवर खूप हसायचो.”

हसीना मान जायेगी हा सिनेमा प्रचंड गाजला. १९९९ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा पाचवा सिनेमा ठरला. हा सिनेमा गोविंदाच्या कारकि‍र्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.