Asha Bhosle Daughter Varsha Bhosle Tragic Suicide Story: बॉलीवूडमधील गायिका, ज्यांनी आपल्या दमदार अन् जादुई आवाजाने अनेक पिढ्यांचे जबरदस्त मनोरंजन केले, त्या म्हणजे आशा भोसले. मंगेशकर कुटुंबाचा वारसा लाभलेल्या आशा त्यांच्या गाण्यांमुळे आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. गाण्यांबरोबरच आशा भोसले या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या आहेत. आशा भोसले यांच्या मुलीने वर्षा भोसले यांनी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती.

आशा भोसले यांचे वैवाहिक व वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. पहिल्या लग्नासाठी त्यांनी सोडलेले घर आणि त्यानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी अनेकदा समोर आल्या आहेत. आयुष्यातील या कठीण प्रसंगांना धीराने सामोऱ्या जाणाऱ्या आशा भोसलेंवर २०१२ मध्ये दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांची मुलगी वर्षा भोसले यांनी वयाच्या ५६व्या वर्षी आत्महत्या केली होती.

कोण होत्या वर्षा भोसले?

वर्षा भोसले या आशा भोसले व त्यांचे पहिले पती गणपतराव भोसले यांच्या कन्या होत्या. त्यांनाही आईकडून गायनाचा वारसा मिळाला होता. तसेच त्या विविध मासिकांसाठी लेखन करत होत्या. पुढे त्यांचे लग्न क्रीडाविषयक लेखन करणारे हेमंत केंकरे यांच्याशी झाले होते. मात्र, पुढे दोघांचा घटस्फोट झाला आणि त्या पुन्हा आई आशा भोसलेंकडे येऊन राहू लागल्या. वर्षा भोसले यांच्या आयुष्यात खूप चढ-उतार आल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाला.

आशा भोसलेंच्या मुलीने केलेली आत्महत्या

वर्षा भोसले यांनी त्यांच्या जवळची माणसं, कुटुंब आणि त्यांचे मित्र-मैत्रीण गमावल्यामुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. त्यांनी जसलोक रुग्णालयात उपचार घेतल्याचेही समोर आले होते. मानसिक आरोग्याच्या त्रासाशी झुंज देत असल्याने वर्षा भोसले यांना रुग्णालयामध्ये दाखल केले जात होते. पण, ऑक्टोबर २०१२ मध्ये आशा भोसले यांच्या मुंबईतील निवासस्थानी वर्षा यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. पोलिसांनी या घटनेचा तपास केला आणि आत्महत्या केल्याची नोंद केली. या घटनेने भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

वर्षा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने त्यांच्या अवस्थेबद्दल सांगितले होते. ते म्हणालेले, “काही वर्षांपासून आम्ही जरा अंतर ठेवून राहत होतो, कारण- कोणत्याही गोष्टीवर तिची प्रतिक्रिया काय असेल हे सांगता यायचं नाही. पण आशा भोसले या एकमेव व्यक्ती होत्या, ज्यांना तिला कसं सांभाळायचं हे माहीत होतं. वर्षाचे आयुष्य खूपच संघर्षमय होतं.”

आशा भोसले यांनी घेतला जगाचा निरोप

दरम्यान, दिग्गज गायिका आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ मध्ये वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सिनेविश्वातील एक सुरेल आवाज हरपला. आशाताईंचे जाणे प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेले.