Tabu Emotional Post: आशा भोसले यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता १२ एप्रिल २०२६ ला त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे.
आशा भोसले यांचा चाहतावर्ग संपूर्ण जगभरात होता. सर्वांना भुरळ पाडेल असा त्यांचा आवाज होता, त्यामुळे सामान्यांसह मनोरंजनसृष्टीतील कलाकारही त्यांचे चाहते होते.
पाच दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेत्री तब्बूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने आशा भोसले यांनी दिलेल्या भेटीबद्दल लिहिले होते. तसेच, आशा भोसले यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले होते.
आशा भोसलेंकडून तब्बूला मिळालेली शेवटची भेटवस्तू
तब्बूने लिहिले, “तुमच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय दिवसांविषयी मला सांगा, ज्या क्षणांना तुम्ही कधीही विसरणार नाही त्याविषयी मला सांगा, सर्वात जास्त कोणत्या गोष्टी मनाला स्पर्शून जातात ते मला सांगा. तुमच्या आयुष्यात तुम्ही सर्वात जास्त जपलेल्या गोष्टींबद्दल सांगा.”
पुढे तिने लिहिले, “नोव्हेंबरमध्ये माझा वाढदिवस होता आणि तेव्हा ही सुंदर भेट माझ्या दारात आली. आशाजींनी ही गिटार मला भेट दिली. माझ्या मनातली कृतज्ञता शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आशाजी, मी तुमच्यावर जेवढं प्रेम आणि तुमचा आदर करते ते शब्दांत सांगणं कठीण आहे. तुमच्या गाण्यांमधून प्रेम, वेदना आणि उत्कटता आम्हाला अनुभवता येते. मी ही भेट आयुष्यभर जपून ठेवेन. मी आशा करते की लवकरच मी तुमची गाणी याच गिटारवर तुमच्यासाठी वाजवून दाखवेन.”
तब्बूने शेअर केलेल्या फोटोंमध्ये आशा भोसले, तसेच त्यांनी तब्बूला दिलेली गिटार पाहायला मिळत आहे. आता आशा भोसले यांच्या निधनानंतर अनेक चाहत्यांनी तब्बूच्या या पोस्टवर भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहिले आहे, तर अनेकांनी निधनाच्या काहीच दिवस आधी आशा भोसले यांची भेट घेता आली, त्यामुळे तब्बू नशीबवान असल्याचे म्हटले आहे.
आशा भोसले यांनी फक्त मराठी आणि हिंदीच नाही तर जगभरातील विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
