Asha Bhosle Last Song Release Date: बॉलीवूडच्या ज्येष्ठ गायिका स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं १२ एप्रिल २०२६ रोजी निधन झालं. त्यांच्या जाण्यानं सिनेविश्वातील एक सुरेल आवाज हरपला. आशाताईंचं जाणं प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेलं. आजही घराघरांत आशाताईंचा स्वर ऐकायला मिळतो. त्यांच्या गाण्यांनी अनेक पिढ्यांचं मनोरंजन केलं असून आता आशा भोसले यांचं शेवटचं गाणं प्रदर्शित होणार आहे.
आशा भोसलेंचं शेवटचं गाणं होणार रिलीज
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनापूर्वी रेकॉर्ड करण्यात आलेलं गाणं लवकरच रिलीज होणार आहे. ड्रामा-कॉमेडी असलेल्या’ओम का हरी’ या सिनेमात ते गाणं असणार आहे. दिवंगत गायिका आशा भोसले यांच्या जादुई आवाजातील शेवटचं गाणं प्रेक्षकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. ‘ए मेरी जिंदगी, तू छुपी है कहाँ’ असं त्या गाण्याचं नाव असून ते येत्या ८ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी आशा भोसले यांची जयंती आहे.
माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक
‘ओम का हरी’ सिनेमात अंशुमान झा मुख्य भूमिकेत असून, आपल्या चित्रपटात आशा भोसले यांचा आवाज असणं ही आयुष्यातील अत्यंत खास गोष्ट असल्याच्या भावना त्यानं व्यक्त केल्या आहेत. अंशुमान म्हणाला, “’ओम का हरी’ सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे, कारण या चित्रपटाची कथा वडिलांबद्दल प्रेम व्यक्त करण्याबाबत आहे आणि माझ्या आयुष्यात ते मला कधीच जमलं नाही. चित्रपटातील भावना व्यक्त करणारं गाणं आशाजींच्या आवाजात असणं हा कलाकार म्हणून माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे.”
आशा भोसले यांच्याबरोबर असलेल्या क्षणांबद्दल अंशुमान झा म्हणाला, “आशाजींबरोबर जेव्हा मी स्टुडिओमध्ये होतो, तो खूप आनंदाचा आणि समाधानाचा क्षण होता. हा क्षण साजरा करण्यासाठी त्या आज आपल्याबरोबर प्रत्यक्ष असत्या, तर आनंद द्विगुणित झाला असता; पण संगीताच्या रूपाने त्या कायम आपल्याबरोबर आहेत.”
अनेक पिढ्यांचा उत्सव साजरा करण्याचा आमचा प्रयत्न
विशेष म्हणजे, हे गाणं २०२३च्या अखेरीस रेकॉर्ड करण्यात आलं होतं. त्यावेळी आशा भोसले ९० वर्षांहून अधिक वयाच्या होत्या. तरीही आपल्या आवाजाने त्यांनी या गाण्यात पुन्हा एकदा जादू निर्माण केली. वडील-मुलाच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या ड्रामा-कॉमेडी चित्रपटाचं दिग्दर्शन हरीश व्यास यांनी केलं आहे. चित्रपटात आशा भोसले यांचं शेवटचं फीचर फिल्ममधील गाणं असल्याबद्दल दिग्दर्शक हरीश व्यास म्हणाले, “त्यांच्या वाढदिवशी हे गाणं प्रदर्शित करणं म्हणजे आशाजींच्या अजरामर आवाजाचा, त्यांच्या महान वारशाचा आणि त्यांच्या संगीताने आयुष्याला स्पर्श केलेल्या अनेक पिढ्यांचा उत्सव साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
आशा भोसलेंनी वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दरम्यान, आशा भोसले यांचं १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
