आशा भोसले आणि आर.डी बर्मन यांनी एकत्र अनेक कलाकृतींसाठी काम करत वेगवेगळी गाणी गायली आणि त्यांना संगीत दिलं, पण फक्त व्यावसायिक आयुष्यातच नाही तर खऱ्या आयुष्यातसुद्धा ते एकमेकांचे जोडीदार होते. आर. डी बर्मन आशा भोसले यांच्या आवाजाचे इतके चाहते होते की, त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी ते धावत गेले होते. आशा भोसले या त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांच्या सुरेल आवाजाबरोबर आर.डी बर्मन त्यांच्या स्वभावाच्याही प्रेमात पडले होते. अनेक वर्षांच्या मैत्रीनंतर दोघांनी १९७९ मध्ये लग्न केलेलं. परंतु, त्यांचं लग्न इतर जोडप्यांप्रमाणे नव्हतं. कारण लग्नानंतरही ते वेगळेच राहत होते.

आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे असलेल्या गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, त्यांच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. या दाम्पत्याला तीन मुलं झाली, पण काही वर्षांनी त्यांचा संसार मोडला. दुसरीकडे, आर. डी बर्मन यांचंही यापूर्वी एकदा लग्न झालं होतं. त्यांनी रीता पटेल यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, पाच वर्षांतच दोघे वेगळे झाले. यानंतर १९७९ मध्ये आशा भोसले आणि आर.डी बर्मन यांनी लग्न केलं. आयुष्यातील अनेक चढ-उतार अनुभवल्यानंतर त्यांनी हे लग्न मुख्यतः एकमेकांच्या सहवासासाठी केलं होतं. आर.डी बर्मन यांना त्यांच्या पद्धतीने स्वतंत्र राहायला आवडत होतं, तर आशा भोसले यांची पहिली जबाबदारी त्यांची तीन मुलं होती. मुलांच्या आयुष्यात स्थिरता कायम राहावी, यासाठी लग्नानंतरही दोघांनी एकाच घरात न राहण्याचा निर्णय घेतला.

…म्हणून लग्नानंतरही वेगळे राहत होते आशा भोसले आणि आर.डी बर्मन

१९९३ मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत आशा भोसले यांनी त्यांची मुलं त्यांच्यासाठी सर्वस्व असल्याचं सांगितलं होतं. त्या पतीपेक्षाही मुलांना अधिक प्राधान्य देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणालेल्या, “मी आणि पंचमदा आम्ही लग्नाचा निर्णय घेतला, तेव्हाच आम्ही एक गोष्ट ठरवली होती. दिवसभर आम्ही एकत्र वेळ घालवायचो, कधी संध्याकाळी एखाद्या पार्टीला जायचो. पण रात्री मी माझ्या मुलांकडे घरी परतायचे आणि पंचमदा त्यांच्या घरी जायचे. आम्ही लग्नानंतर एकही रात्र एकत्र घालवली नाही. कारण माझ्या मुलांसाठी मी आई आणि वडील दोन्ही भूमिका पार पाडत होते.” त्या काळात आशा भोसले आणि आर. डी. बर्मन यांची ही राहण्याची पद्धत अनेकांना वेगळी आणि चुकिची वाटत होती. त्यांच्या आजूबाजूला नेहमीच अनेक लोक असायचे. काहीजण त्यांच्या नात्याबद्दल गैरसमज निर्माण करून अफवा पसरवायचे असं म्हटलं जातं. त्यामुळे लग्नानंतरही वेगवेगळ्या घरात राहण्याच्या त्यांच्या निर्णयाचा अनेकांनी चुकीचा अर्थ लावला आणि त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा रंगल्या.

आमचं नातं म्हणजे संगीतातून जन्माला आलेलं लग्न – आशा

आशा भोसले आणि आर. डी बर्मन या दोघांनी अनेक मुलाखतींमध्ये लग्नाचा विचार आर.डी बर्मन यांनीच आधी मांडला होता, असं सांगितलं आहे. १९९३ मध्ये मृत्युंजय कुमार झा यांना दिलेल्या मुलाखतीत आर.डी बर्मन म्हणाले होते की, प्रेम होण्याआधीपासूनच आम्हा दोघांमध्ये संगीतामुळे एक खास नातं निर्माण झालं होतं. आशा भोसले यांनीही सांगितलं होतं की, लग्नाच्या वेळी त्या ४६ वर्षांच्या होत्या, तर पंचम ४० वर्षांचे होते. त्यामुळे त्यांच्या नात्यात प्रचंड परिपक्वता होती. त्या म्हणाल्या, “आमचं नातं म्हणजे संगीतातून जन्माला आलेलं लग्न होतं. मी कशी आहे हे त्यांना माहीत होतं आणि ते कसे आहेत हे मला माहीत होतं. आमचं नातं हे सुरांचं नातं होतं.”

आशा भोसले यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांचे पती त्यांना प्रेम व्यक्त करण्यासाठी दररोज फुलं पाठवायचे. त्यांच्या गायनाचंही ते नेहमी भरभरून कौतुक करायचे. मात्र, आशा भोसले यावेळी खूप सावध होत्या, कारण वयाच्या १६व्या वर्षी घेतलेल्या लग्नाच्या निर्णयाची चूक त्यांना पुन्हा करायची नव्हती. त्या म्हणाल्या होत्या, “त्यांंनी केलेलं कौतुक ऐकून मला आनंद व्हायचा. पण मला पुन्हा लग्न करण्याची घाई नव्हती. पंचम अनेक वर्षं माझ्यामागे लग्नासाठी आग्रह करत होते. अखेर त्यांनी मला पटवून दिलं की, त्यांना माझ्या आवाज खूप आवडो आणि त्यांचं माझ्या गायनावर जास्त प्रेम आहे”. याबद्दल त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.