आशा भोसले हयात असत्या तर आज, ८ सप्टेंबर रोजी त्यांचा ९३वा वाढदिवस साजरा करत असत्या. काही महिन्यांपूर्वी याच वर्षी एप्रिलमध्ये त्यांचं निधन झालं. आपल्या अजरामर संगीताचा वारसा सोडून गेलेल्या आशा भोसले यांनी अनेक कलाकारांना घडवलं आणि त्यांच्या कारकिर्दीला नवी दिशा दिली. त्यापैकी एक नाव म्हणजे अदनान सामी. आशा भोसले यांच्या दीर्घकाळच्या सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या अदनान सामीने, त्यांच्या आग्रहामुळेच भारतात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला होता. “माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टींचं श्रेय मी त्यांना देतो,” असं या लोकप्रिय गायकाने आता सांगितलं आहे.
स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं आहे. अदनान सामीने आठवण सांगताना म्हटलं की, १९९७ मध्ये तो आणि आशा भोसले लंडनमध्ये त्यांच्या गाजलेल्या ‘कभी तो नजर मिलाओ’ या अल्बमचं रेकॉर्डिंग करत होते. त्यावेळी आशा भोसले यांनी त्याला हा अल्बम कुठे रिलीज करण्याचा विचार आहे, असं विचारलं. त्यावेळी अदनान सामी लंडनमध्ये राहत असल्यामुळे त्याने लंडनमध्येच अल्बम रिलीज करण्याचं सांगितलं. मात्र, आशा भोसलेंना हा निर्णय मान्य नव्हता. त्यांनी त्याच्याकडे हा अल्बम मुंबईत रिलीज करण्याचा आग्रह केला. हिंदी संगीताची जागतिक राजधानी मुंबई असल्याचं सांगत त्यांनी याचं महत्त्व पटवून दिलं. त्या म्हणाल्या, “मुंबईत हिट झाला, तर तो सगळीकडे हिट होईल. मुंबईपेक्षा चांगलं वितरणाचं माध्यम दुसरं कोणतंही नाही”.
अदनान सामीवर रागावलेल्या आशा भोसले
अदनान सामीने आशा भोसले यांना, “मी तिथे कोणालाच ओळखत नाही”, असं सांगितलं. त्यावर त्यांनी त्यांच्याकडे अतिशय रागाने पाहिलं. “तिथे कोणालाच ओळखत नाहीस?” असं त्यांनी थेट त्यांच्या डोळ्यात पाहत विचारलं. अदनान सामीने पुढे सांगितलं, “मला त्यांची मदत घेऊन उपकार करून घ्यायचे नाहीत, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर त्या म्हणाल्या की, ही काही मदत नाही आणि हा अल्बम जितका माझा आहे, तितकाच त्यांचाही आहे. त्यांना माझ्यासाठी एक अल्बमची निर्मितीही करायची होती. त्यामुळे मी त्याच विचाराने भारतात आलो. खरं तर मी फक्त महिनाभर पुरतील इतके कपडे घेऊन आलो होतो, पण नंतर आयुष्यभरासाठी इथेच राहिलो”.
‘कभी तो नजर मिलाओ’ हा अल्बम केवळ भारतातच नाही, तर जगभरात गाजला. या अल्बममुळे २०००च्या दशकाच्या सुरुवातीला अदनान सामी लोकप्रिय आणि आश्वासक पॉप आयकॉन म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे त्याने राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लकी: नो टाइम फॉर लव्ह’ या रोमँटिक चित्रपटासाठी आशा भोसले यांच्यासाठी ‘लकी लिप्स’ हे गाणं संगीतबद्ध केलं. गेल्याच वर्षी दोघांनी ‘आओ ना’ या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र काम केलं. भारतामध्ये आणत आपल्या कारकिर्दीला नवी दिशा दिल्याबद्दल अदनान सामी आजही आशा भोसले यांचा आभारी आहे. एवढंच नाही तर भारतात आल्यानंतर त्यांनी अदनान सामीची त्यांचे दिवंगत पती आणि दिग्गज संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या मुंबईतील घरातही राहण्याची व्यवस्था केली होती.
आर. डी. बर्मन यांचा अदनान सामीच्या कारकिर्दीवर प्रभाव
अदनान सामी अवघ्या १० वर्षांचा असताना लंडनमध्ये झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये त्याने स्वतः संगीतबद्ध केलेली धून सादर करून आर. डी. बर्मन आणि आशा भोसले यांना प्रभावित केलं होतं. मात्र, अदनान सामीनेच ही धून संगीतबद्ध केली आहे का, याबाबत बर्मन यांना शंका होती. त्यावर या १० वर्षांच्या मुलाने आपल्या पोर्टेबल की-बोर्डवर तीच धून वाजवून आपणच तिची रचना केल्याचं सिद्ध केलं. त्यावेळी आर. डी. बर्मन आणि आशा भोसले या दोघांनीही अदनान सामीच्या संगीत कारकिर्दीवर मोठा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, १९९४ मध्ये आर. डी. बर्मन यांचं निधन झालं, त्यानंतर काही वर्षांनी भारतात अदनान सामीच्या संगीताला मोठं यश मिळालं. आर. डी. बर्मन आपल्या पुढील प्रवासाचे आणि यशाचे साक्षीदार होऊ शकले नाहीत, याची आजही त्याला खंत आहे.
“मला आठवतंय, एकदा आशाजी मला म्हणाल्या होत्या, पंचम आज असता, तर तुला पाहून त्याला खूप आनंद झाला असता. त्यांच्या या शब्दांची आठवण आजही माझ्या मनात आहे. कारण त्यांनी मला नेहमीच खूप प्रोत्साहन दिलं,” असं अदनान सामीने सांगितलं. बर्मन या नावाशी अदनान सामीचं नातं खूप जुनं आहे. १९७०च्या दशकात तो अवघ्या पाच वर्षांचा असताना पोर्तुगालमध्ये राहत होता. त्यावेळी एखाद्या चित्रपटाच्या संगीतकाराच्या नावाखाली बर्मन दिसलं की, तो चित्रपट आपण पाहायलाच हवा, असं तो ठरवायचा.
म्हणूनच आशा भोसले यांची एक कौतुकाची थाप अदनान सामीसाठी आयुष्यभराच्या कामगिरीचा पुरस्कार मिळाल्यासारखी होती. आशा भोसलेंबद्दल तो पुढे म्हणाला, “मला आठवतंय, लंडनमध्ये कभी तो नजर मिलाओचं रेकॉर्डिंग केल्यानंतर मी आशाजींना हिथ्रो विमानतळावर सोडायला गेलो होतो. इमिग्रेशन काऊंटरकडे जाण्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं, पंचमनंतर माझा आवाज जर कोणी समजून घेतला असेल, तर तो तू आहेस.”
